महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:15 IST2025-02-28T04:15:23+5:302025-02-28T04:15:35+5:30
मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले.

महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ असून, तो यशस्वीरीत्या पार पडला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. १३ जानेवारीपासून सुमारे ४५ दिवस सुरू असलेल्या व ६६.३१ कोटी भाविक सहभागी झालेल्या महाकुंभ मेळ्याची बुधवारी सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, महाकुंभ मेळ्याच्या विशाल आयोजनाची तुलना नव्याने जागृत झालेल्या, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेल्या व मुक्तपणे श्वास घेणाऱ्या एखाद्या देशाशी करावीशी वाटते.
मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले. या महान धार्मिक सोहळ्याने भारताला मोठी ऊर्जा मिळाली आहे. महाकुंभासारखा भव्य सोहळा आयोजित करणे सोपे नसते. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनात सफाई कर्मचारी, पोलिस, बोट, वाहनचालक आदी सर्व लोकांनी समर्पण आणि सेवावृत्तीने सहभागी झाले. महाकुंभ मेळ्याचे आयोजन हा व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय बनला आहे. गंगा, यमुनासारख्या देशातील सर्वच नद्या स्वच्छ ठेवण्यासाठीही देशभरातील जनतेला या कुंभमेळ्याने प्रेरणा दिली आहे.
‘वसुधैव कुटुंबकम’ची प्रचिती : योगी आदित्यनाथ
महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी मोदी यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे आभार मानले. अशा धार्मिक सोहळ्यांचे आयोजन पाठिंब्याच्या जोरावर करता येते. ‘वसुधैव कुटुंबकम’ची महाकुंभ मेळ्यातून प्रचिती मिळाली, असे ते म्हणाले.
‘महाकुंभसाठी १६ हजार रेल्वेगाड्या चालविल्या’
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, महाकुंभ मेळ्यासाठी १६,००० हून अधिक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. त्यातून ५ कोटी लोकांनी प्रयागराजपर्यंत प्रवास केला व महाकुंभात पवित्र स्नान करून परत गावी रवाना झाले. २०१९च्या कुंभमेळ्यात सुमारे ४,००० रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या.