महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला होणार भाविकांची मोठी गर्दी, आतापर्यंत १५ कोटी लोकांचे पवित्र स्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:26 IST2025-01-28T12:25:23+5:302025-01-28T12:26:11+5:30
MahaKumbh 2025 : आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्यांची संख्या १५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या १७ दिवसांत १५ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे.

महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला होणार भाविकांची मोठी गर्दी, आतापर्यंत १५ कोटी लोकांचे पवित्र स्नान
MahaKumbh 2025 : प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या १५ कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक देश-विदेशातून येत आहेत. महाकुंभ मेळ्यात तिसरे शेवटचे स्नान २९ जानेवारी रोजी म्हणजेच मौनी अमावस्येला होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये पोहोचत आहेत.
आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्यांची संख्या १५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या १७ दिवसांत १५ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. गेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने ३.५ कोटी भाविक, पूज्य संत आणि कल्पवासींनी महाकुंभात अमृत स्नान केले होते.
दरम्यान, आता महाकुंभ मेळ्यात येत्या मौनी अमावस्येला ८ ते १० कोटी लोक त्रिवेणी संगमावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, महाकुंभात येणाऱ्या भाविकांच्या सोयीकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे. महाकुंभ मेळ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
मौनी अमावस्येनंतर फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी अमृत स्नान केले जाईल. अशा परिस्थितीत भाविक मोठ्या संख्येने प्रयागराजला पोहोचत आहेत. दरम्यान, महाकुंभ मेळा १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारी रोजी, म्हणजेच महाशिवरात्रीला अंतिम अमृत स्नानाने संपणार आहे. महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी अयोध्या आणि काशीकडेही जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ३० तासांत २५ लाखांहून अधिक भाविकांनी अयोध्येत भगवान रामाचे दर्शन घेतले आहे.