ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:59 IST2025-02-12T13:58:41+5:302025-02-12T13:59:12+5:30
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी सध्या उत्तर भारतात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, रेल्वे, बस आणि इतर मिळेल त्या वाहनाने हे भाविक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत.

ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला, व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी सध्या उत्तर भारतात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, रेल्वे, बस आणि इतर मिळेल त्या वाहनाने हे भाविक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसेच बेसुमार गर्दीमुळे टेनमधून प्रवास करणंही कठीण होऊन बसलं आहे. दरम्यान, आधीच खचाखच भरून आलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करता येत नसल्याने ट्रेनमधील बंद दरवाजे उघडण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी ट्रेनमधील प्रवाशांवर बांबू टोचून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
जोगबनी येथून दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. त्यात ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेले प्रवासी खिडकीमधून बांबूने धक्का देत आत जागा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनही या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ कटिहार रेल्वे स्टेशनवरील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओला रेल्वे प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.
रेल्वेमध्ये प्रवाशांच्या चढ-उतारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे. विनातिकीट. तसेच विना आरक्षण ट्रेनमधून प्रवास करू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र कटिहार रेल्वे विभागाचे एडीआरएम मनोज कुमार सिंह यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला दुजोरा देण्यास नकार दिला आहे.