महाकुंभात अध्यात्माचा उपदेश देणारे मुमताज अली खान चर्चेत, श्री एम नावाने मिळाली ओळख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 22:05 IST2025-01-29T22:04:29+5:302025-01-29T22:05:22+5:30
Mahakumbh 2025 : 2020 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

महाकुंभात अध्यात्माचा उपदेश देणारे मुमताज अली खान चर्चेत, श्री एम नावाने मिळाली ओळख...
Mahakumbh 2025 : पवित्र महाकुंभात अमृत स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू-संत महाकुंभात दाखल झाले आहेत. 13 प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त मेळा परिसरात बांधलेल्या शिबिरांमध्ये अनेक साधू-सांत-बाबांची शिबिरे आहेत. मात्र यात एका मुस्लिम अध्यात्मिक गुरुचे शिबिर चर्चेचा विषय बनले आहे. दररोज शेकडो-हजारो भारतीय-विदेशी भाविक या शिबिरात येत आहेत. या गुरूचे नाव मुमताज अली खान असून त्यांना श्री एम, या नावाने ओळखले जाते. आता हे श्री एम कोण आहेत आणि त्यांची हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रम का चर्चा होत आहे, हे जाणून घ्या...
केरळमधील मुस्लिम कुटुंबात जन्म
मुमताज अली खान यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1949 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि हिमालयात राहायला गेले. येथे ते अनेक संतांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्यांना मुमताज अलीऐवजी श्री एम किंवा मधुकर नाथ नावाने ओळखले जाऊ लागले. श्री एम सत्संग फाउंडेशन चालवतात आणि त्यांना 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या अध्यात्मिक जीवनाविषयी बोलताना ते सांगतात की, या जीवनात हा प्रवास वयाच्या 8 व्या वर्षी सुरू झाला, पण माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. माझे गुरू महेश्वरनाथ बाबांनी मला त्रिवेंद्रममध्ये शोधून काढले होते. इथे कोणीतरी आहे, ज्याला अध्यात्म शिकवायचे आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. यावरून असे दिसून येते की, आमचे पूर्वीजन्माचे नाते आहे. बालपणीच्या या भेटीनंतर महेश्वरनाथ अदृश्य झाले आणि सुमारे 10 वर्षांनी बद्रीनाथच्या गुहेत पुन्हा भेटले. तोपर्यंत माझ्या आयुष्यात अध्यात्माची ठिणगी जागृत झाली होती. पुन्हा तीन वर्षे गुरूंकडे राहून त्यांनी दीक्षा घेतली.
सत्संग फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवा
आपल्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत श्री एम जे काही शिकले ते जगाला सांगण्याच्या मार्गावर निघाले. या अंतर्गत त्यांनी सत्संग फाउंडेशनची स्थापना केली, ज्याचा उद्देश सर्व धर्मांचा गाभा शोधणे हा आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, वास्तविक ज्ञानासाठी गाभ्यापर्यंत जाण्याची गरज आहे. सत्संग फाऊंडेशन देखील त्याच मिशनवर कार्य करते. सर्व धर्माच्या साधकांच्या सभा आणि सत्संग आयोजित केले जातात.
सत्संग फाउंडेशन व्यतिरिक्त श्री एम देशभरात शाळा, रुग्णालये आणि लोककल्याण कार्यक्रम चालवतात. याशिवाय योग क्षेत्रातही त्यांचे प्राविण्य आहे. हे मिशन पुढे नेण्याच्या उद्देशाने श्री एम महाकुंभात पोहोचले आहेत. येथे ते जगभरातून येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करत आहेत. अनेक परदेशी भक्तही त्यांच्या शिबिरात येतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.