मुंबई ते प्रयागराज जितका विमान प्रवास दर तितक्या खर्चात परदेशात जाल; DGCA हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:09 IST2025-01-27T13:09:09+5:302025-01-27T13:09:45+5:30
महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत.

मुंबई ते प्रयागराज जितका विमान प्रवास दर तितक्या खर्चात परदेशात जाल; DGCA हैराण
प्रयागराज - तब्बल १४४ वर्षांनी भरलेल्या महाकुंभ मेळ्यात कोट्यवधीच्या संख्येने भाविक येत आहेत. आतापर्यंत ११ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. देशातच नाही तर परदेशातूनही मोठ्या श्रद्धेने भाविक प्रयागराज इथं येत आहेत. महाकुंभसाठी होणारी गर्दी जशी वाढत आहेत तसा इथे येणारा विमान प्रवासही महागला आहे. दिल्ली अथवा मुंबईतून प्रयागराजला पोहचण्यासाठी विमानाचं तिकिट इतकं महागलं आहे ज्यात तुम्ही सिंगापूर, दुबई, लंडनसारखे देश फिरून याल. प्रयागराजला हवाई प्रवासाने जाण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानाच्या दिवशी फ्लाईट तिकिट सर्वाधिक दराने विकली जात आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकिट दर गगनाला भिडलेत. सामान्य दिवशी दिल्लीतून प्रयागराजला जाण्यासाठी १०-१२ हजार रुपये दर आकारले जातात तर मुंबईतून प्रयागराजला जाण्यासाठी १५ हजारांपर्यंत दर घेतला जातो. परंतु शाही स्नानाच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्यांना दिल्लीतून प्रयागराज ५० हजार रुपये आणि मुंबईतून ५०-६० हजार रुपये तिकिट दर आकारले जात आहेत.
विशेष म्हणजे दिल्ली ते लंडन ३ फेब्रुवारीला विमानाचे तिकिट दर ३०-३५ हजार इतके आहेत. दिल्ली सिंगापूर प्रवासाचा दर २४-२५ हजार रुपये आहे. महाकुंभसाठी विमान तिकिट दरात वाढ पाहून लोकांनी या कंपन्यांवर अंकुश लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वाढणाऱ्या तिकिट दराकडे लक्ष वेढत सरकारकडे ते कमी करण्याची मागणी केली आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षा, सुविधा यांचं राज्य सरकार लक्ष ठेवत आहे परंतु काही विमान कंपन्या यातून संधी शोधत दरात वाढ करत आहेत ते अयोग्य असल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं.
दरम्यान, महाकुंभसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातायेत, त्यात प्रवाशांसाठी सुविधेसह तिकिट दर मर्यादित ठेवले आहेत. विमान कंपन्यांनी इकोनॉमी क्लाससाठी २०० ते ७०० टक्के तिकिट दरात वाढ केलेत. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या मागणीकडे लक्ष देत विमान वाहतूक नियामक(DGCA) अलर्ट झालं आहे. महाकुंभसाठी प्रयागराजला येणाऱ्या विमान तिकिट दरावर विचार करावा असं त्यांनी सांगितले. तसेच भाविकांची वाढती मागणी पाहून ८१ अतिरिक्त उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे.