महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:27 IST2025-01-15T18:23:45+5:302025-01-15T18:27:12+5:30

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यात साधु-संत-महंतांपेक्षा साध्वी हर्षा रिछारिया यांच्या सहभागाबाबत जास्त चर्चा रंगली असून, यावरून वाद निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

maha kumbh mela 2025 shankaracharya avimukteshwaranand saraswati got angry on sadhvi harsha richaria behavior | महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

Maha Kumbh Mela 2025: जगातील सर्वांत मोठे धार्मिक संमेलन असलेल्या महाकुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी मकरसंक्रांतीला विविध आखाड्यांच्या साधूसंतांनी त्रिवेणी संगमावर पहिले अमृतस्नान केले. या ठिकाणी तब्बल ३.५० कोटी भाविकांनी स्नान केले. महाकुंभातील सर्वात पहिले पवित्र स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी पार पडले. प्रयागराज येथे देशविदेशांतून असंख्य लोक महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधु-संतांच्या अनेक कहाण्याही समोर येत आहेत. यातच महाकुंभमेळ्यात काही वाद होताना पाहायला मिळत आहेत. साध्वी हर्षा रिछारिया यांच्याबद्दल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संताप व्यक्त केला आहे.

विविध आखाडे तसेच हिंदू धर्मातील विविध संप्रदायातील लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्यात स्नान केले. श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभु पंचायती अटल आखाड्याच्या सदस्यांनी सर्वात पहिल्यांदा अमृतस्नान केले. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. येथे देश-विदेशातील लोक संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. पण, येथील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे ती उत्तराखंड येथून आलेली साध्वी हर्षा. विशेष म्हणजे, ती या कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र तिच्या साध्वी वेशापेक्षाही, तिचे आणखी एक वेगळे रूपही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. साध्वी हर्षा रिछारिया यांच्याबद्दल शं‍कराचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती का संतापले?

प्रयागराज महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानात मॉडेल आणि अँकर हर्षा रिछारियाचा समावेश करून तिला महामंडलेश्वरच्या शाहीरथावर बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाकुंभात अशी परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विकृत मानसिकतेचे परिणाम आहे. महाकुंभात रंगरुप, चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर मनाचे, हृदयाचे सौंदर्य दिसायला हवे होते. अद्याप संन्यास घ्यायचा की, विवाह करायचा, हे ठरलेले नाही, अशा व्यक्तीला संत आणि ऋषींच्या शाहीरथावर स्थान देणे योग्य नाही. ती भक्त म्हणून सहभागी झाली असती तर एकवेळ चालले असते, परंतु, शाहीरथावर बसणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. सनातन धर्माबाबत समर्पण असणे आवश्यक आहे, असे शंकराचार्य म्हणाले.

दरम्यान, साध्वी हर्षाने नुकताच दावा केला होता की, ती महामंडलेश्वर यांची शिष्या असून दोन वर्षांपूर्वी ग्लॅमरस जीवन सोडून पूर्णपणे सनातन संस्कृतीकडे वळली आहे. मात्र, तिचा गेल्या एक वर्षापूर्वीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन वर्षांपूर्वीच ग्लॅमरस जग सोडून सनातन संस्कृती स्वीकारल्याचा दावा करणाऱ्या हर्षाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साध्वी हर्षा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर १३ जानेवारी रोजी त्यांचे ६६७K फॉलोअर्स होते. त्यानंतर एका दिवसांत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली. त्यांचे फॉलोअर्स १ मिलियनपर्यंत पोहोचले. 

 

Web Title: maha kumbh mela 2025 shankaracharya avimukteshwaranand saraswati got angry on sadhvi harsha richaria behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.