स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:43 IST2025-01-08T16:41:05+5:302025-01-08T16:43:18+5:30
Maha Kumbh 2025: Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल महाकुंभात सहभागी होणार आहेत.

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...
Maha Kumbh 2025:उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीपासून पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभासाठी जगभरातून लाखो भाविक, साधू-संत येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महाकुंभासाठी एक विशेष पाहुणी महाकुंभासाठी येणार आहे. ही विशेष पाहुणी स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल आहेत. त्या 'कल्पवास' या प्राचीन हिंदू परंपरेत सहभागी होणार आहेत.
13 जानेवारीला प्रयागराजमध्ये येणार
जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन 13 जानेवारीला प्रयागराजमध्ये दाखल होतील. त्या निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत.
29 जानेवारीपर्यंत कल्पवासात राहणार
आपल्या या महाकुंभ दौऱ्यात लॉरेन पॉवेल 29 जानेवारीपर्यंत कल्पवास येथे राहतील. इथे त्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार असून, पवित्र प्रयागराज संगमात स्तान करणार आहेत.
लॉरेन पॉवेल काय करतात?
लॉरेन पॉवेल जॉब्स यांना पती स्टीव्ह जॉब्सकडून त्यांना संपत्तीचा वारसा मिळाला आहे. अॅपल व्यतिरिक्त पॉवेल जॉब्स त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी इमर्सन कलेक्टिव्ह नावाची फर्म स्थापन केली आहे, जी शिक्षण, आर्थिक गतिशीलता, इमिग्रेशन आणि पर्यावरण समस्यांवर काम करते. त्यांनी 2021 मध्ये Waverley Street Foundation देखील तयार केली, जी पर्यावरण क्षेत्रात कार्य करते.
कल्पवास काय आहे?
महाकुंभाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कल्पवास. ही परंपरा खूप जुनी असून, त्याचा उल्लेख महाभारत आणि रामचरितमानस सारख्या ग्रंथात आढळतो. जे लोक कल्पवास करतात, त्यांना कल्पवासी म्हणतात. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा कल्पवासाचा काळ असतो. जे कल्पवास करतात, ते आपले आरामदायी जीवन सोडून संगमाजवळ साध्या तंबूत राहतात आणि दररोज गंगा नदीत स्नान करुन भजन अन् संतांची प्रवचने ऐकतात. साध्या भाषेत सांगायचे तर, काही दिवस संन्यासी आयुष्य जगणे म्हणजे कल्पवास.