"मला आई व्हायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…", पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मागणी, डॉक्टर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:38 IST2024-12-23T19:35:41+5:302024-12-23T19:38:11+5:30
डॉक्टरांच्या समजुतीनंतर पत्नी कशीतरी तयार झाली, त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

"मला आई व्हायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…", पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मागणी, डॉक्टर म्हणाले...
मध्य प्रदेशातील रीवामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने डॉक्टरांकडे विचित्र मागणी केली. यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त करत महिलेने आपल्या मृत पतीच्या शुक्राणूंची (स्पर्म) मागणी केली. यासाठी महिलेने डॉक्टरांना मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापासून रोखले. दरम्यान, पतीचा मृत्यू होऊन २४ तास उलटून गेल्यामुळे शुक्राणू जतन करता येत नाहीत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयात शुक्राणू जतन करण्याची सुविधा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या समजुतीनंतर पत्नी कशीतरी तयार झाली, त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
रीवा शहरातील बिचिया पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस लाईनजवळील चौकात झालेल्या दुचाकी अपघातात सिधी जिल्ह्यातील चुरहट येथील जितेंद्र सिंह गहरवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र सिंह गहरवार यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी संजय गांधी रुग्णालयात आणला. अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी शहराबाहेर होती. त्यामुळे तिला फोनद्वारे जितेंद्र सिंह गहरवार यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर पत्नीने फोनवर आपल्या पतीचे पोस्टमार्टम करू नका, असे सांगितले.
दरम्यान, जितेंद्र सिंह गहरवार यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. जितेंद्र सिंह गहरवार यांच्या पत्नीला मुलाची आई व्हायचे होते. याच कारणामुळे पत्नीने जितेंद्र सिंह गहरवार यांचे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यानंतर ती संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्येही पोहोचली आणि तिथल्या डॉक्टरांना पतीचे स्पर्म जपून ठेवण्यास सांगितले. तर वैद्यकीय डॉक्टरांनी साफ नकार दिला. यामागे दोन कारणे होती, पहिले कारण म्हणजे २४ तासांनंतर शुक्राणू जतन करता येत नाहीत आणि दुसरे म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयात शुक्राणू जतन करण्याची सुविधा नाही.
मृत व्यक्तीच्या शरीरातील शुक्राणू २४ तासांच्या आत जतन करणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त वेळ निघून गेल्यावर शुक्राणू जतन केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय, ही प्रक्रिया अवलंबण्याची कोणतीही सुविधा वैद्यकीय महाविद्यालयात नाही, असे मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे एचओडी डॉ. रजनीश कुमार पांडे यांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर मृताच्या पत्नीने एकच गोंधळ घातला. यानंतर डॉक्टर आणि पोलिसांनी खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीने पोस्टमॉर्टम करण्यासाठी होकार दिला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.