प्रेयसीची हत्या करुन ६ महिने फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह; नव्या भाडेकरुने लाईट बंद करताच प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:00 IST2025-01-11T09:56:46+5:302025-01-11T10:00:23+5:30
मध्य प्रदेशात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सहा महिने फ्रिजमध्ये ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रेयसीची हत्या करुन ६ महिने फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह; नव्या भाडेकरुने लाईट बंद करताच प्रकार उघड
Madhya Pradesh Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमधून आणखी एक भयानक हत्याकांड समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील देवास येथील वृंदावन धाम कॉलनीतील एका घरात फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. गेल्या सहा महिन्यांपासून महिलेचा मृतदेह हा फ्रिजमध्ये बंद होता अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
शेजाऱ्यांना कल्पनाच नाही
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. फ्रिजचा वीजपुरवठा खंडित झाल्याने खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर हा खून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृतदेह ज्या खोलीत ठेवण्यात आला होता, त्या खोलीच्या शेजारीच दुसऱ्या भाडेकरूचे कुटुंब राहत होते, मात्र आजतागायत कोणालाही याची कल्पना नव्हती.
२०२३ मध्ये घेतलं होतं घर भाड्याने
पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती असे पीडितेचे नाव आहे. तर संजय पाटीदार असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. उद्योगपती धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देवास येथील वृंदावन धाम येथे दोन मजली घर आहे. ते सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजला भाड्याने घेतला होता. परंतु जुन्या भाडेकरूने कुलूप लावलेल्या दोन खोल्या त्याला वापरता आल्या नाहीत. धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै २०२३ मध्ये संजय पाटीदार याला हे घर भाड्याने दिले होते. संजयने जून २०२४ मध्ये घर सोडले होते.
नव्या भाडेकरुमुळे हत्येची घटना उघड
संजय पाटीदारने जूनमध्येच फ्लॅट रिकामा केला होता, मात्र त्याने फ्रीजसह काही वस्तू दोन खोल्यांमध्ये बंद करून ठेवल्या होत्या. आपण लवकरच आपले सामान परत घेण्यासाठी येऊ, असं तो श्रीवास्तव यांना वारंवार सांगत होता. बलवीरला त्या खोल्यांची गरज होती म्हणून त्याने घरमालकाशी बोलणं केलं. घरमालकाने कुलूप तोडून खोली वापरण्यास सांगितले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बलवीरने कुलूप तोडले असता फ्रीज सुरू असल्याचे त्याला आढळून आले. जुन्या भाडेकरूने चुकून फ्रीज चालू ठेवला होता, असं त्याला वाटलं म्हणून त्याने तो बंद केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या वस्तू काढू असा विचार बलवीरने खोली बंद केली.
मात्र शुक्रवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. काही लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फ्रीज उघडले असता त्यांना कुजलेला मृतदेह आढळून आला. पिंकीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता संजय पाटीदारचे नाव पुढे आले. मार्च २०२४ मध्ये पिकींला शेवटचे पाहिले होते, असं शेजाऱ्यांनी सांगितले. शेजाऱ्यांनी विचारले असता पिंकी तिच्या माहेरी गेल्याचे संजयने सांगितले होते.
संजय पाटीदार प्रतिभासोबत पाच वर्षे लिव्ह-इनमध्ये होता. तो उज्जैनमध्ये तीन वर्षे राहिला. पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. "हत्येच्या दिवशी मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिभाने ऐकलं नाही. तेव्हा तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि हाय स्पीड मोड चालू केला," असं पाटीदारने पोलिसांना सांगितले.