Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:33 IST2025-12-03T10:32:01+5:302025-12-03T10:33:41+5:30
108 Service Ambulance: मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील अंजद येथे १०८ रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चालक आणि कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.

Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील अंजद येथे १०८ रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चालक आणि कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. अपघात होऊन एक तास उलटल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्याने, रहिवाशांनी चालक आणि इमर्जन्सी मेडिसिन टेक्निशियनवर फुले उधळली आणि त्यांना नारळ अर्पण करून त्यांचे स्वागत केले. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजद शहरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बडवानी रोडवर दोन दुचाकींची धडक होऊन पाच जण जखमी झाले. अपघातानंतर सुमारे एक तासानंतर १०८ रुग्णवाहिका जखमींना घेण्यासाठी आली. तोपर्यंत दोन गंभीर जखमींना खासगी वाहनांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरित तिघांना घेण्यासाठी रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यामुळे रहिवासी संतप्त झाले. त्यांनी रुग्णवाहिका चालक आणि इमर्जन्सी मेडिसिन टेक्निशियनवर यांना फुलांचे हार घातले आणि उशिरा आल्याबद्दल निषेध म्हणून त्यांना नारळ दिले.
अंजडमधील १०८ रुग्णवाहिका सेवा जवळपास दोन महिन्यांपासून बंद आहे. या अनोख्या निषेधामुळे तरी परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. या घटनेवर स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अंजडची रुग्णवाहिका लाखो शिवभक्तांच्या पंचक्रोशी यात्रेसाठी दोन दिवसांसाठी तैनात करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून अंजडला दुसरी रुग्णवाहिका पाठविण्यात आली.
मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा जामरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३८ रुग्णवाहिकांपैकी १२ रुग्णवाहिका सध्या बंद आहेत. निष्काळजीपणा दाखवणाऱ्या व्यवस्थापकांवर दंड ठोठावण्यात आला असून, सेवेत दुर्लक्ष करणाऱ्यांवर पुढील दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.