काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:03 IST2019-07-10T16:01:37+5:302019-07-10T16:03:25+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान सरकारचे अर्थसंकल्प सादर

काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व
जयपूर/भोपाळ: मध्य प्रदेशातील कमलनाथ आणि राजस्थानमधील गेहलोत सरकारनं सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. तर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारनं आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात गोशाळेसोबतच 'राम वन गमन पथ' विकसित करण्याची घोषणा केली.
राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं जाहीरनाम्यात पशू कल्याणासोबतच गोशाळा स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात भटक्या जनावरांच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीत नंदी गाय आश्रयांची स्थापना करण्याची घोषणा केली. भटक्या जनावरांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेले असून त्यांच्याकडून वारंवार आंदोलनं केली जात होती.
मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारनंदेखील आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री तरुण भनोत यांनी अर्थसंकल्पातून सॉफ्ट हिंदुत्व अधोरेखित केलं. भनोत यांनी गोरक्षणासाठी १३०९ कोटींची तरतूद केली. राज्यातील प्रत्येक गावात गोशाळा उभारण्याची घोषणा त्यांनी केली. मंदिरांच्या जमिनीवर सरकारी निधीतून गोशाळा बांधल्या जाणार आहेत.