रस्त्यावर मद्यपानाला विरोध करणाऱ्या पोलीस हवालदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाणा; विरोध करणाऱ्यांनाही धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:04 IST2025-04-28T15:00:18+5:302025-04-28T15:04:46+5:30

मध्य प्रदेशात पोलीस कर्मचाऱ्याला मद्यधुंद तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Madhya Pradesh Railway police officer was beaten up by drunken youths | रस्त्यावर मद्यपानाला विरोध करणाऱ्या पोलीस हवालदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाणा; विरोध करणाऱ्यांनाही धमकावले

रस्त्यावर मद्यपानाला विरोध करणाऱ्या पोलीस हवालदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाणा; विरोध करणाऱ्यांनाही धमकावले

MP Crime:मध्य प्रदेशातपोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी रात्री मद्यधुंद तरुणांनी रेल्वे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तरुण पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर भोपाळमधील प्रशासन आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत.

भोपाळच्या राणी कमलापती स्टेशनवर शनिवारी रात्री उशिरा मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातला. जीआरपी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दौलत खान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांना दारू पिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यात आली. यादरम्यान, हेड कॉन्स्टेबलचा गणवेशही फाटला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तरुणांकडून दौलत खान यांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.

शनिवारी रात्री २ च्या सुमारास, जीआरपीचे पथक स्टेशन परिसरात असलेल्या बन्सल वनची दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, स्टेशन परिसरात काही तरुण गाडीत बसून दारू पीत होते. हेड कॉन्स्टेबल दौलत खान यांनी त्याला पाहिले. जेव्हा त्यांनी त्या तरुणांना तिथे दारू पिण्यापासून रोखले तेव्हा ते संतापले आणि त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर तरुणांनी दौलत खान यांच्यावर हल्ला केला. तरुणांनी त्यांना गाडीत ढकलले आणि जबर मारहाण केली. यादरम्यान त्यांचा गणवेश फाटला आणि गंभीर दुखापत झाली.

दौलत खान यांना मारहाण होत असल्याचे पाहून इतर कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी गेले. हेड कॉन्स्टेबल संदीप आणि कमल रघुवंशी यांनी खान यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोरांनी त्यांनाही धमकावले आणि आक्षेपार्ह धार्मिक टिप्पणी केली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने अतिरिक्त पोलीस कुमक बोलण्यात आली. यानंतर मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र इतर दोन आरोपी फरार झाले. 

या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी दौलत खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, मुख्य आरोपी जितेंद्र यादवला अटक करण्यात आली असून आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात आरोपी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी अश्लील टिप्पणी देखील केली होती.

Web Title: Madhya Pradesh Railway police officer was beaten up by drunken youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.