काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:17 IST2022-10-09T14:16:02+5:302022-10-09T14:17:40+5:30
अपघातात एक व्यक्ती जखमी झाला, त्याचे हाड मोडले. डॉक्टरांनी प्लास्टरऐवजी चक्क पुठ्ठा बांधला.

काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा
भिंड:मध्य प्रदेश राज्यातील आरोग्य सेवा इतकी वाईट आहे की, रुग्णालयांमध्ये मलमपट्टीदेखील उपलब्ध नाही. अशीच एक घटना भिंड जिल्ह्यातून समोर आली आहे. अपघातात जखमी व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तो उपचारासाठी आरोग्य केंद्रात पोहोचला आला. पण, त्या रुग्णाच्या पायाला प्लास्टर लावण्याऐवजी डॉक्टरांनी चक्क पुठ्ठा बांधला. तसेच, वेदना कमी करण्यासाठी तात्पुरते औषध देण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंडमधील अंतियान पुरा येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले. यातील एका तरुणाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला उपचारासाठी राऊण रुग्णालयात नेले. तिथे पायावर प्लास्टर लावण्याऐवजी डॉक्टरांनी पुठ्ठा बांधला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर पायातील पुठ्ठा काढून प्लास्टर लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले. आरोग्य केंद्रात तैनात असलेले डॉक्टर हेमंत तिवारी सांगतात की, रुग्णालयात आलेल्या जखमी व्यक्तीच्या पायावर आधीच पुठ्ठ्याने पट्टी बांधलेली होती. त्यांनी फक्त त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. दुसरीकडे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी जे.एस.राजपूत सांगतात की, आधारासाठी पुठ्ठा वापरता येतो. मात्र आरोग्य केंद्रात प्लास्टर पट्टी न लावणे चुकीचेच आहे. मलमपट्टी संपली असेल तर जिल्ह्यातून आदेश द्यायला हवे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.