"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:26 IST2025-04-30T12:24:34+5:302025-04-30T12:26:00+5:30
तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. हातात फलक घेऊन तरुण दोन महिन्यांपासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की, त्याच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे.
धर्मेंद्र नागराज असं या तरुणाचं नाव आहे. धर्मेंद्रच्या पत्नीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं आणि त्याला त्याच्या सासरच्या लोकांवर संशय आहे. हातात एक फलक घेऊन तो त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी मदत मागत आहे.
तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक कारमधून आले आणि त्यांनी पत्नी यशवीचं अपहरण केलं. प्रेमविवाहामुळे सासरच्या मंडळींना राग आला होता आणि त्यांनी पत्नीला परत घेऊन जाण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर धर्मेंद्रने छिपाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीएम हेल्पलाइन १८१ आणि एसपी ऑफिसमध्येही तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.
२ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण
धर्मेंद्रने सांगितलं की, ५ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ५ वर्षांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर, दोघांनीही घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आनंदाने आयुष्य जगत होते, पण २ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. पोलीसही या प्रकरणात मदत करत नाहीत.
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"
पती म्हणतो की, त्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता धर्मेंद्रला एका अनोळखी नंबरवरून यशवीचा मेसेज आला. यशवीने मेसेजमध्ये लिहिलं होतं, मला घेऊन जायला ये, हे लोक मला घेऊन आले आहेत. तिने मेसेजमध्ये घराचा पत्ताही लिहिला. एकटा येऊ नकोस, पोलिसांनाही सोबत घेऊन ये कारण इथे खूप गुंड आहेत असा सल्लाही दिला. तिने असंही सांगितले की तिचं सकाळी ९ वाजेपर्यंत तिचं दुसरं लग्न लावलं जाईल आणि हे लोक धर्मेंद्रला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवतील.
सासरच्या लोकांना प्रेमविवाहाचा राग होता. म्हणूनच संशय माझ्या सासरच्या लोकांवर आहे. मी चिपाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली पण आतापर्यंत पोलीस विभागाने कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही असंही तरुणाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.