madhya pradesh girls to get benefit of scheme only on providing picture of groom standing inside of toilet | ...म्हणून 'या' ठिकाणी नवरदेवाला शौचालयात उभं राहून काढावा लागतो फोटो 
...म्हणून 'या' ठिकाणी नवरदेवाला शौचालयात उभं राहून काढावा लागतो फोटो 

ठळक मुद्देभोपाळमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.नवऱ्या मुलाला घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत. शौचालयांच्या निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने हे करण्यात आलं आहे.

भोपाळ - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच सध्या लग्नाआधीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट केलं जातं. सध्या तरुणाईमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटची खूप क्रेझ आहे. मात्र शौचालयात उभं राहून जर कोणी फोटो काढायला सांगितलं तर सुरुवातीला ते विचित्र वाटेल. पण हो हे खरं आहे. कारण मध्य प्रदेशच्या काही भागातील नवरदेवांना आपल्या घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत. 

भोपाळमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. मात्र यासाठी नवऱ्या मुलाला घरातील शौचालयात उभं राहून फोटो काढावे लागत आहेत. शौचालयांच्या निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने हे करण्यात आलं आहे. नवऱ्याच्या घरात शौचालय असेल तरच या योजनेअंतर्गत फॉर्म स्विकारला जातो. त्यानंतरच कन्या विवाह योजनेअंतर्गत नवरी मुलीला 51 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शौचालय नसल्यास नवदांपत्याला या पैशांवर पाणी सोडावं लागणार आहे. 

शासकीय अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाऊन शौचालय आहे का याची तपासणी करण्यापेक्षा होणाऱ्या नवऱ्याने शौचालयात उभे राहून काढलेल्या फोटोची मागणी करत असल्याची माहिती मिळत आहे. हे फक्त ग्रामीण भागातच नाही तर भोपाळ महानगर पालिकेपर्यंत जारी करण्यात आले आहे. भोपाळमध्ये एका सामूहिक विवाह कार्यक्रमात विवाह करणाऱ्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाने नवरा शौचालयात उभा आहे असा फोटो असलेले विवाह दाखल्याचा जरा विचार करून पाहा कसं वाटेल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. 

महापालिका योजना प्रभारी सी. बी. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहाच्या आधी 30 दिवसांमध्ये घरात शौचालय तयार करावे अशी अट होती, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. शौचालयात उभा असलेल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो लावणे ही चुकीची गोष्ट असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. हा फोटो विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेचा भाग नाही असं म्हटलं आहे. तसेच शौचालय हा स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे मान्य आहे, मात्र ही प्रक्रिया अधिक चांगली करता येऊ शकते, असे नगरसेवक आणि काँग्रेसचे स्थानिक नेते रफीक कुरेशी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री कन्या विवाह योजना ही आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18 डिसेंबरला सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी या योजनेतील रकमेत वाढ करूत 28 हजारांवरून ती 51 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली. याच कारणामुळे घराघरात जाऊन शौचालयांची तपासणी करणे अधिकाऱ्यांसाठी अतिशय कठीण होऊ लागले. त्यावर उपाय म्हणूनच होणाऱ्या नवऱ्याने आपल्या शौचालयात उभे राहून फोटो काढण्याची कल्पना पुढे आल्याची माहिती मिळत आहे. 
 


Web Title: madhya pradesh girls to get benefit of scheme only on providing picture of groom standing inside of toilet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.