Madhya Pradesh crisis: Cabinet meeting convened by CM Kamal Nath hrb | मध्य प्रदेशात सत्तेचे नाटक सुरू; कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

मध्य प्रदेशात सत्तेचे नाटक सुरू; कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

ठळक मुद्देउद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितल्याने मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. यामुळे कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. 


काँग्रेसच्या 82 आमदारांना राजस्थानमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले असून मॅरियॉट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या हॉटेलला पोलिसांसह कार्यकर्त्यांनीही वेढा घातला आहे. तर उद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितल्याने मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. यानंतर ते आमदारांसोबत चर्चेसाठी हॉटेलवर जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे पोहोचले आहेत. उद्या बहुमत चाचणीसाठी त्यांच्यात चर्चा होऊ शकते. गुरगावमध्ये मानेसरच्या एका रिसॉर्टमध्ये भाजपाचे आमदारांना ठेवण्यात आले असून रविवारी भोपाळला आणले जाऊ शकते. तर बंगळुरु येथील शिंदे समर्थक आमदारांनाही उद्या विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी भोपाळमध्ये आणले जाऊ शकते. काँग्रेस आणि भाजपाने उद्या सर्व आमदारांनी हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 


कोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मात्र, असे केल्यास कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांनी सोमवारीच बहुमत सिद्ध करण्य़ास सांगितले आहे.

Web Title: Madhya Pradesh crisis: Cabinet meeting convened by CM Kamal Nath hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.