काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:च्याच तोंडाला फासलं काळं; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 17:15 IST2023-12-07T17:01:23+5:302023-12-07T17:15:04+5:30
काँग्रेसच्या ज्या आमदाराने आज स्वत:च्या तोंडाला काळं फासलं त्यांना मतदारसंघातील जनतेनं तब्बल २९ हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून दिलं आहे.

काँग्रेस आमदाराने राजभवनासमोर स्वत:च्याच तोंडाला फासलं काळं; कारण...
भोपाळ : निवडणूक निकालावरून विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैज लागल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र निवडणुकीपूर्वी भाजपच्या जागांबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरल्याने काँग्रेस नेत्याने चक्क स्वत:चं तोंड काळं करून घेतल्याचा प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. या घटनेची मध्य प्रदेशसह देशभरात चर्चा होत आहे. फूलसिंह बरैया असं या नेत्याचं नाव असून विशेष म्हणजे बैरया हे स्वत: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भरघोस निवडून आले आहेत.
काँग्रस नेते आणि आमदार फूलसिंह बरैया यांनी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपला ५० हून अधिक जागा मिळाल्या तर मी माझं तोंड काळं करेन, अशी घोषणा केली होती. तसंच यासाठी त्यांनी ठिकाण, तारीख आणि वेळही सांगितली होती. मध्य प्रदेशात भाजपने तब्बल १६३ जागा जिंकत आपली सत्ता राखली. त्यानंतर काँग्रेस नेते बैरय्या यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज ७ डिसेंबर रोजी भोपाळ येथील राजभवनासमोर दुपारी २ वाजता स्वत:च्या तोंडाला काळं फासलं.
"लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मी काळं फासून घेतलं आहे. मी जो शब्द दिला होता, तो खरा करून दाखवण्यासाठी आज हे कृत्य केलं. आमचे नेते दिग्विजय सिंह यांनी मला असं करण्यास मनाई केली होती. मात्र मी माझा शब्द पूर्ण केला. लोकशाहीसाठी माझी आणि काँग्रेस पक्षाची लढाई सुरूच राहील," असं आमदार फूलसिंह बरैया यांनी म्हटलं आहे.
मतदारसंघात प्रचंड मतांनी विजयी
काँग्रेसच्या फूलसिंह बरैया यांनी भाजपच्या जागांबाबत केलेलं भाकीत खोटं ठरलं असलं तरीही ते ज्या भांडेर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, तेथील जनतेने बरैया यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तब्बल २९ हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून दिलं आहे. फूलसिंह बरैया यांनी भाजप उमेदवार घनश्याम पिरौनिया यांचा पराभव केला आहे.
दरम्यान, यंदाच्या मध्य प्रदेश विधानसभा निवणूक काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भाजपवर लोकांचा राग असून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत होता. मात्र २२९ जागा असणाऱ्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसला केवळ ६३ जागांवर विजय मिळवता आला आहे.