महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:43 IST2025-11-10T11:41:53+5:302025-11-10T11:43:36+5:30
Pollution: भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
नवी दिल्ली - भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.
गाझियाबादमधील ३१ वर्षीय एका महिलेला काही दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने तपासणी केली असता 'स्टेज २' फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे समोर आले. ती कधीही धूम्रपान करत नव्हती. हा प्रकार गंभीर इशारा देणारा असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
हवेच्या प्रदूषणाशी थेट संबंध
हवाप्रदूषणाचा आणि फुप्फुसाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाचा थेट संबंध असल्याचे डॉक्टर सांगतात. 'आपण दिवसाला जवळपास २५,००० वेळा श्वास घेतो. त्यातून बेंझीन, रॅडॉनसारख्या विषारी वायूंचा फुप्फुसांवर गंभीर परिणाम होतो,' असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
कमी वयातच होतोय फुप्फुसाचा कर्करोग
डॉक्टरांच्या मते, फुप्फुसाचा कर्करोग आता केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वायुप्रदूषण, रासायनिक वायू आणि हवेतील सूक्ष्मकण हे मोठे कारण ठरत आहेत.
वर्षांखालील ५० लोकांमध्येही हा कर्करोग वाढताना दिसतो आहे.
लक्षणे क्षयरोगासारखी, उशिरा निदान होणे घातक
भारतात या आजाराचे निदान बहुतांश वेळा उशिरा होते; कारण याची लक्षणे क्षयरोगासारखी असतात. जसे दीर्घकाळ खोकला, थकवा आणि कफातून रक्त येणे. त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत कर्करोग अनेकदा 'स्टेज ४'पर्यंत पोहोचतो.
दीर्घकाळ खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा रक्तासह खोकला अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका आहे, असा सल्ला डॉक्टर देतात.