मंगळवारी सत्ताधारी-विरोधकांचे 'शक्तीप्रदर्शन', दिल्लीत NDA तर बंगळुरुत विरोधकांची महाबैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:01 IST2023-07-17T20:58:18+5:302023-07-17T21:01:48+5:30
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

मंगळवारी सत्ताधारी-विरोधकांचे 'शक्तीप्रदर्शन', दिल्लीत NDA तर बंगळुरुत विरोधकांची महाबैठक
LokSabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर NDA आणि UPA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. उद्याचा दिवस(दि.18) राष्ट्रीय राजकारणासाठी फार महत्वाचा असणार आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत सत्ताधारी एनडीएची बैठक होत आहे, तर दुसरीकडे बंगळुरुमध्ये यूपीएची बैठक होत आहे.
गेल्या महिन्यात बिहारच्या पाटण्यात विरोधी ऐक्याची पहिली बैठक झाली होती. त्या बैठकीत 16 पक्षांची हजेरी लावली होती. आता बंगळुरुच्या दुसऱ्या बैठकीत 24 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. तर, एनडीएच्या बैठकीत तीसपेक्षा जास्त पक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे महाराष्ट्रात एनडीएची ताकत वाढणार आहे. याशिवाय, चिराग पासवान, जितनराम मांझी, ओमप्रकाश राजभर, उपेंद्र कुशवाह यांनीही एनडीएक सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न
लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यापूर्वी आपली ताकत दाखवण्यसाठी आणि वातावरण निर्मितीसाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपला अद्याप जुने मित्रपक्ष अकाली दल आणि टीडीपी यांना एनडीएमध्ये सामील करुन घेण्यात यश आलेले नाही. टीडीपी आणि अकाली दल एनडीएमध्ये सामील होण्याचे चान्सेस 50-50 आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू असून, येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल.
काही पक्ष तटस्थ
एकीकडे देशाच्या राजकारणात दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत, तर दुसरीकडे असे काही राजकीय पक्ष आहेत, ज्यांनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेससह अनेक पक्ष आहेत. हे पक्ष ना भाजपमध्ये सामील झाले आहेत ना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी ऐक्यात जात आहेत. लोकसभानिवडणूक जवळ आल्यानंतर यांचीही भूमिका स्पष्ट होईल.
एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार
एकीकडे एनडीएच्या केवळ 30 पक्षांची यादी समोर आली असताना, दुसरीकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या नऊ वर्षांत एनडीएचा आलेख वाढला आहे. विकासाचा अजेंडा पुढे नेण्याची लोकांची वाढती इच्छा एनडीएच्या विस्तारास कारणीभूत ठरली आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत सुशासन मिळाले आहे, असे नड्डा म्हणाले.