“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:12 IST2025-07-29T06:10:37+5:302025-07-29T06:12:13+5:30
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली.

“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात झालेल्या चुका स्वीकारण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घ्यायला हवी. तसेच, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी केली.
ते म्हणाले की, भारत व पाकने संघर्ष थांबविला नाही तर या दोन्ही देशांशी अमेरिका व्यापार करणार नाही असा इशारा दिल्यानेच त्यांनी शस्त्रसंधी केली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर २८वेळा केला. या घटनाक्रमात केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे. पाक पुन्हा दहशतवादी हल्ले करू शकतो अशी शक्यता सत्ताधाऱ्यांना वाटतेय. जर अशी स्थिती असेल तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे कसे म्हणता येईल? ही कारवाई करण्यामागे आमचा युद्धाचा हेतू नव्हता असे केंद्र सरकार म्हणत आहे. जर असे असेल तर पाकविरोधात युद्ध करण्याचा भारताचा का विचार नव्हता? पाकव्याप्त काश्मीर आपण केव्हा परत घेणार, असे प्रश्न गौरव गोगोई यांनी विचारले.
थरूर म्हणाले, सध्या माझे मौनव्रत आहे
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणाऱ्या चर्चेमध्ये बोलण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा काँग्रेसने खासदार शशी थरूर यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. सध्या माझे मौनव्रत आहे, असे ते म्हणाले.
तुम्ही ट्रम्प यांना एवढे घाबरता का?
१४० कोटी लोक सांगत होते की युद्ध करा आणि तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की तुम्ही युद्ध थांबवत आहात. केंद्र सरकारने किमान एकदा तरी ट्रम्प यांना चुकीचे ठरवावे. मात्र ते हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एवढे घाबरता का? इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले.
‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला ‘ऑपरेशन सिंदूर’ नको होते, तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते म्हणजे त्या दहशतवाद्यांना भारताने भस्मसात करायला हवे होते. पाकिस्तानशी निर्णायक लढाई करायला हवी होती. मात्र यात अपयश मिळवले आणि कारवाई उशिरा का झाली? हे जनतेला कळले पाहिजे, असे सपा खासदार रामशंकर राजभर यांनी म्हटले.