लालकृष्ण अडवाणींना भाजपा उमेदवारी देणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 16:41 IST2019-03-20T16:36:38+5:302019-03-20T16:41:57+5:30
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी द्यावी का नाही यावर भाजपाची भूमिका स्पष्ट होत नाही. भाजपाकडून आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्याचं काम सुरु आहे

लालकृष्ण अडवाणींना भाजपा उमेदवारी देणार का ?
अहमदाबाद - गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी द्यावी का नाही यावर भाजपाची भूमिका स्पष्ट होत नाही. भाजपाकडून आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्याचं काम सुरु आहे. मात्र लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत पार्टीकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात झाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी देशाचे गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान पद भूषवणारे लालकृष्ण अडवाणी सलग सहा वेळा गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
1980-90 च्या दशकात राम मंदिर उभारण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीने देशभरात आंदोलन केले होते. भाजपाच्या जडणघडणीत लालकृष्ण अडवाणी यांचा मोठा वाटा आहे. 1984 साली देशात भारतीय जनता पार्टीच्या फक्त 2 जागा निवडून आल्या होत्या. या काळापासून भाजपाच्या वाढीसाठी त्यांनी अनेक आंदोलने, कार्यक्रम हाती घेतले. मात्र सध्याच्या राजकारणात लालकृष्ण अडवाणी राजकीय पटलावरुन बाजूला सारले गेले आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्यावरुन अडवाणी यांनी विरोध केला होता.
लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीवरुन विचारलेल्या प्रश्नावर भाजपाचे सचिव दीपक चोपडा यांनी सांगितले की, आत्तापर्यत अडवाणी यांना उमेदवारी द्यावी का यावर निर्णय झालेला नाही. पक्षाने देखील अडवाणी यांच्याशी संपर्क साधला नाही तसेच अडवाणी यांनीही पार्टीला उमेदवारीबाबत विचारणा केली नाही. मात्र गुजरातमधील भाजपाच्या काही नेत्यांना वाटत आहे की, वाढते वय लक्षात घेता लालकृष्ण अडवाणी यांची स्वत: आगामी निवडणूक न लढण्याची मानसिकता आहे. त्याचबरोबर चोपडा यांनी सांगितले की अडवाणी पार्टीतील ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारीसाठी दावा करण्याचीही गरज नाही.
गुजरातमधील गांधीनगरची जागा ही भाजपाचा गड असून, तेथे आगामी निवडणुकीत भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी येथून षटकार मारणार की नवीन चेहऱ्याला भाजपा संधी देणार याबाबत विविध अटकळी आहेत.