Lok Sabha Election 2019 Don't need BJP's money, Bengal has enough to rebuild Vidyasagar statue | विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता

विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ९ जागांवर मतदान होणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून सुरू असलेली तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील जुगलबंदी अद्याप संपलेली नाही. दोन दिवसांपूर्वी उभय पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्यात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. तसेच थोर समाजसेवक विद्यासागर यांच्या पुतळ्याचे नुकसान करण्यात आले. मात्र भाजपकडून विद्यासागर यांचा पूर्वीपेक्षा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.

कोलकाता येथील एका कॉलेजमध्ये बसविण्यात आलेल्या पुतळ्याचे काही समाजकंटकांनी नुकसान केले होते. विद्यासागर यांचा पुतळा उभारण्यासाठी पश्चिम बंगालकडे आवश्यक सगळ्या गोष्टी आहे. पुतळा उभारणीसाठी आम्हाला भाजपच्या पैशांची गरज नसल्याचे ममता यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आयोजित सभेत ममता बोलत होत्या.

याआधी उत्तर प्रदेशात आयोजित सभेत मोदींनी पुतळा उभारणीसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर ममता यांनी लगेच उत्तर दिले. मोदी म्हणातात, आपण विद्यासागर यांचा पुतळा उभारणार आहोत. मात्र पुतळ्यासाठी आम्ही भाजपकडून पैसे का घ्यावे. पुतळ्यांचे नुकसान करणे भाजपची सवय असून याआधी त्रिपुरामध्ये देखील भाजपकडून असच करण्यात आले होते, असा आरोपही ममता यांनी भाजपवर केला.

दरम्यान बंगालमधील २०० वर्षे जुना पुतळा पाडणाऱ्या भाजपला पश्चिम बंगालमधील जनता कधीही माफ करणार नाही, असंही ममता यांनी सांगितले. भाजप लोकांमध्ये द्वेष निर्माण करून खोट पोस्ट शेअर करून दंगे भडकविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी ममता यांनी केला.

Web Title: Lok Sabha Election 2019 Don't need BJP's money, Bengal has enough to rebuild Vidyasagar statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.