अखिलेश यांना भाजप नेत्याची आझमगढमध्ये मदतीची 'ऑफर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 15:13 IST2019-03-24T15:11:50+5:302019-03-24T15:13:21+5:30
आयपी सिंह यांनी म्हटले की, अखिलेश यादव आझमगढमधून निवडणूक लढविणार या घोषणेमुळे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागातील युवकांचा उत्साह वाढला आहे. अखिलेश यांच्यामुळे भागाचा विकास होईल.

अखिलेश यांना भाजप नेत्याची आझमगढमध्ये मदतीची 'ऑफर'
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आय.पी. सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या आझमगडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. यावर सिंह यांनी अखिलेश यांना मतदार संघात संपूर्ण मदत करण्याची जाहीर ऑफरच दिली आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आझमगढ येथून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सपाच्या नेत्यांऐवजी भाजपनेतेच आनंदीत झाल्याचे चित्र आहे. आय.पी. सिंह यांनी अखिलेश यांच्या निर्णयानंतर निवडणुकीसाठीचे कार्यालय माझ्या घरातच बनवा अशी ऑफर दिली आहे. या संदर्भात सिंह यांनी ट्विट केले आहे. भाजपनेते सिंह हे मुळचे आझमगडचे रहिवासी आहेत.
आयपी सिंह यांनी म्हटले की, अखिलेश यादव आझमगढमधून निवडणूक लढविणार या घोषणेमुळे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागातील युवकांचा उत्साह वाढला आहे. अखिलेश यांच्यामुळे भागाचा विकास होईल. तसेच जात आणि धर्माच्या राजकारणाचा नाश होईल, तुम्ही आझमगढमध्ये माझ्या घरी पक्षाचे निवडणूक कार्यालय केल्यास मला आनंदच होईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आय.पी. सिंह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. भाजपच्या चौकादार मोहिमेत सर्वांनी सोशल मीडियावर आपल्या नावापूर्वी चौकीदार लावले असताना सिंह यांनी उसूलदार लावले आहे. तर अखिलेश यांना दिलेल्या ऑफरमुळे सिंह समाजवादी पक्षात जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.