मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:26 IST2019-05-02T14:24:56+5:302019-05-02T14:26:06+5:30
या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिरीराज सिंह म्हणतात, जेव्हा पासून देशात मोदी सरकार स्थापन झाले, तेव्हापासून मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी सैन्याला देखील शिव्या घातल्या आहेत.

मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे बेगूसराय मतदार संघातील लोकसभा उमेदवार गिरीराज सिंह यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. वरिष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी अतिरेक्यांचे समर्थन करत असल्याचे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिरीराज सिंह म्हणतात, जेव्हा पासून देशात मोदी सरकार स्थापन झाले, तेव्हापासून मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी सैन्याला देखील शिव्या घातल्या आहेत. पूर्वी संपूर्ण देशात बॉम्बस्फोट होत असे आता, काश्मीरमधील तीन जिल्ह्यातच हे बॉम्बस्फोट होतात, असंही गिरीराज यांनी नमूद केले. व्हिडिओत गिरीराज सिंह यांची जीभ घसरल्याचे दिसून आले.
गिरीराज सिंह नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी परिचीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी देशातील मुस्लीमांना कबरीसाठी जागा हवी असल्यास वंदे मातरम आणि भारत माता की जय, म्हणावे लागले, असा इशारा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस देखील बजावली होती.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शाह हे गिरीराज सिंह यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.