Lockdown love story ... He walked 2,000 km for the love of his girlfriend on Facebook, but ... MMG | लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

लॉकडाऊन लव्हस्टोरी, फेसबुकवरील मैत्रिणीच्या प्रेमासाठी तो २ हजार किमी चालत आला, पण...

मुंबई -कोरोना लॉकडाऊन काळात सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे. अगदी गावच्या सरपंचापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच या प्लॅटफॉर्मचा वापर करुन संपर्क अभियान सुरु ठेवलं. घरातून बाहेर पडता येत नसल्याने, फेसबुक, व्हॉट्सअॅप व इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान आणि संवाद साधण्यात आला आहे. याच काळात, बांग्लादेशातील एका युवकाची पंजाबमधील तरुणीशी मैत्री झाली. त्यातून, तिच्या प्रेमासाठी तो चक्क २ हजार किमी पायपीट करुन पंजाबपर्यंत पोहोचला. 

बांग्लादेशातून २ हजार किमीची पायपीट करुन युवक अमृतसर येथे पोहोचला. विशेष म्हणजे पुढे केवळ २७ किमी पायी जाऊन त्याला लाहौर येथे पोहोचायचे होते. प्रेमात वेडा झालेला हा तरुण कोलकातामार्गे भारतीय सीमा ओलांडून आला, पण अटारी बॉर्डर येथे अडकला. येथून पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात असताना, बीएसएफच्या जवानांनी घुसखोर म्हणून त्याला अटक केली. या तरुणाचा नाव नयन उर्फ अब्दुल्लाह असून तो बांग्लादेशच्या शरीयतपूरचा रहिवाशी आहे. या तरुणाकडे सखोल चौकशी केल्यानंतर प्रेमाचं सत्य समोर आलं.  

लाहौरमधील रुबिनानामक युवतीसोबत नयनची फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघेही रात्रभर एकमेकांशी बोलत, त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हळू हळू गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. त्यामुळे रुबीनाने त्याला पाकिस्तानला बोलावून घेतले. मात्र, आपल्या घरापासून पाकिस्तान बराच दूर आहे, त्यामुळे भेट अशक्य वाटत होती. मात्र, पाकिस्तानमध्ये आल्यास आपण लग्न करू असं वचन रुबीनाने दिले होते. त्यामुळे, जोखीम पत्करत नयने बांग्लादेशची सीमा पार करत, भारतीय हद्दीत प्रवेश केला. कोलकाता येथून दिल्ली गाठली. दिल्लीतून अमृतसरपर्यंत पायीच प्रवास केला. रुबीनाच्या भेटीच्या ओढीत दिवस-रात्र चालत होता. कधी उपाशीपोटीच तो झोपतही होता. मात्र, लॉकडाऊन असल्याने लोकांनी वाटेत मदत केली. जेवणाचं साहित्यही भेटत गेलं. अमृतसर पोहोचल्यानंतर भेटीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

अमृतसर येथून केवळ २७ किमी दूरवरील लाहौर येथे रुबीना होती. मात्र, अमृतसरच्या सीमारेषेवर सगळीकडे सैन्य तैनात केलेले होते. फेसिंगमुळे त्याला सीमारेषेवरुन जाताना अडचण निर्माण होत होती. त्याचदरम्यान, सीमारेषेवरील जवानांनी संशयास्पद असल्याने या युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर, येथील काहन गढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. पोलिसांना त्याच्याकडे कुठलिही संशयास्पद वस्तू नाही मिळाली. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown love story ... He walked 2,000 km for the love of his girlfriend on Facebook, but ... MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.