२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:41 IST2025-12-04T12:40:33+5:302025-12-04T12:41:01+5:30
पंजाबमध्ये शहरी भागात भाजपाची पकड मजबूत आहे मात्र आजही ग्रामीण भागात शिरोमणी अकाली दल पाय रोवून आहे. त्यांचा चांगला प्रभाव मतदारांवर आहे असं भाजपाच्या नेत्यांनी नेतृत्वाला सांगितले आहे.

२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
चंदीगड - आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. पंजाबमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत संकेत दिलेत. फेब्रुवारी २०२७ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी शिरोमणी अकाली दलासोबत पुन्हा नव्याने मैत्रीचा अध्याय सुरू करण्यासाठी भाजपा नेते इच्छुक आहेत. परंतु काही नेत्यांनी याला विरोध करून स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता युतीबाबतचा चेंडू भाजपाच्या हायकमांडकडे गेला आहे.
पंजाबमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी उघडपणे भाजपाच्या विजयासाठी शिरोमणी अकाली दल सोबत असणं गरजेचे आहे असं विधान केले. मागील काही दिवसांपासून अमरिंदर सिंग यांनी युतीचा सूर लावून धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिरोमणी अकाली दल यांच्याशिवाय भाजपा २०२७ असो वा २०३२ च्या निवडणुकीत एकटे जिंकणे शक्य नाही. जाखड यांनीही त्याची री ओढली आहे. कॅप्टन अमरिंदर आणि जाखड या दोघांनाही काँग्रेसची पार्श्वभूमी आहे मात्र पक्षातील वादानंतर या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
अमरिंदर सिंग आणि जाखड यांची भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक वाढली आहे आणि आता दोन्ही नेते आपापल्या परिने पंजाबमधील राजकीय परिस्थितीची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला करून देत आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या मदतीने भाजपा पंजाबमध्ये कसं सरकार बनवू शकते या दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंजाबमध्ये शहरी भागात भाजपाची पकड मजबूत आहे मात्र आजही ग्रामीण भागात शिरोमणी अकाली दल पाय रोवून आहे. त्यांचा चांगला प्रभाव मतदारांवर आहे असं भाजपाच्या नेत्यांनी नेतृत्वाला सांगितले आहे. दुसरीकडे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्यासह काही नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी असं भाजपा नेतृत्वाला म्हटलं आहे.
शिरोमणी अकाली दलासोबत युतीची गरज का?
दरम्यान, पंजाबच्या राजकारणात १९६९ नंतर शिरोमणी अकाली दलाचा प्रभाव वाढला. या पक्षाच्या नेत्यांनी विशेषत: ग्रामीण भागात चांगली पकड बनवली. त्याच बळावर शिरोमणी अकाली दलाने राज्यात ७ वेळा सत्ता स्थापन केली आहे परंतु सध्या शिरोमणी अकाली दल राजकीय संकटात आहे. २०२२ च्या निवडणुकीत केवळ ३ जागांवर शिरोमणी अकाली दलाला समाधान मानावे लागले. त्यातून पक्षात फूट पडली आणि नवीन पक्ष उभा राहिला. २८ वर्षापूर्वी शिरोमणी अकाली दलाने भाजपासोबत युती करून राज्यातील राजकारण बदललं होते. १९९६ साली प्रकाश सिंग बादल यांनी बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला होता. ज्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून एकत्र निवडणुका लढवल्या. दिल्लीत शेतकरी आंदोलनावेळी शिरोमणी अकाली दलाने २४ वर्षांनी भाजपासोबत युती तोडली होती. त्यानंतर आता पुन्हा हे दोन्ही एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.