एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन
By मोरेश्वर येरम | Updated: December 25, 2020 15:02 IST2020-12-25T14:58:41+5:302020-12-25T15:02:33+5:30
शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी.

एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन
नवी दिल्ली
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना चर्चेचं आवाहन करत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले नाहीत, तर ते मागे घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.
"रस्त्यावर आंदोलनाला बसलेले शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांप्रती सरकारला पूर्ण आदर आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं हिताचं नसेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत", असं राजनाथ सिंह म्हणाले. द्वारका येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते.
"शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी. जर या कायद्यांमधून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही, तर सरकार हे कायदे तात्काळ रद्द करेल", असं आश्वासन राजनाथ यांनी दिलं आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सरकारला जाण असून कोणत्याही समस्येवर चर्चेनेच तोडगा निघतो. पंतप्रधान मोदींनाही शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे, असंही राजनाथ यावेळी म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येऊन सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.