२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; पीयूष गोयल यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:49 IST2025-10-19T12:49:36+5:302025-10-19T12:49:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले.

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; पीयूष गोयल यांनी केले आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केला आहे. त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी देशातील सर्व नागरिकांनी एकजुटीने काम करणे व आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकर, महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या रुमा देवी व बुद्धिबळातील युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख या तीन ख्यातनाम व्यक्तींना डायनामाईट न्यूजच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त यंदाच्या वर्षासाठीचे यंग इंडिया कंट्री अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोयल तर मुख्य वक्ते म्हणून माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश बिंदल, भाजपचे माजी राज्यसभा खासदार डॉ. अनिल अग्रवाल, डायनामाईट न्यूजचे संस्थापक व मुख्य संपादक मनोज टिबरेवाल आकाश, चॅनेलच्या अध्यक्ष राणी टिबरेवाल आदी मान्यवरही उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या महिला सबलीकरणाच्या प्रतीक: माजी सरन्यायाधीश
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, ‘यंग इंडिया कंट्री अवॉर्ड’साठी प्रतिभावंत महिलांची निवड करण्यात आली आहे. त्या एकप्रकारे महिला सबलीकरणाच्या प्रतीक आहेत. भारताची आजची स्थिती लक्षात घेतली, तर एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४५ कोटी लोक १८ वर्षे वयापेक्षा कमी वयाचे आहेत. देशातील ८५ टक्के लोकसंख्या ४९ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. सुमारे २५ कोटी मुले १० वर्षे वयाखालील आहे. अशा भारताला प्रगतीसाठी अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.