लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 07:02 IST2025-09-28T07:02:36+5:302025-09-28T07:02:57+5:30
गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.

लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
लेह : गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. लडाखचे पोलिस महासंचालक एस. डी. सिंह जामवाल यांनी शनिवारी ही माहिती दिली. दरम्यान, अटकेत असलेल्या वांगचूक यांना राजस्थानातील जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे.
वांगचूक यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ सीमापार पाठवल्याप्रकरणी एका पाकिस्तानी गुप्तहेर एजंटला अटक करण्यात आली असून, या अनुषंगाने वांगचूक यांच्या पाकिस्तानी संबंधांचा तपास केला जात आहे.
सोशल प्रोफाइल काय...
पोलिस महासंचालक जामवाल यांच्यानुसार, तपासात जे काही आढळले आहे, ते इतक्यात जाहीर करता येणार नाही. परंतु, त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल आणि पोस्ट पाहिल्या, तर त्यांची भाषणे लोकांना भडकावणारी वाटतात. कारण, त्यांनी सातत्याने अरब क्रांती, नेपाळमधील जेन-झेड आंदोलन किंवा बांगला देश आणि श्रीलंकेतील अशांतीचा उल्लेख केलेला आहे.
परदेशी निधी आणि एफसीआरएचे उल्लंघन
वांगचूक यांच्याविरुद्ध परदेशातून मिळणारा निधी आणि विदेशी चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाकिस्तानच्या ‘द डॉन’च्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.