लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:10 IST2025-10-08T13:09:04+5:302025-10-08T13:10:25+5:30
East India Company Pension: आजही सुरू आहे 'वसीका'ची परंपरा, ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या कर्जाचा अनोखा करार!

लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
लखनऊ, भारताच्या इतिहासाच्या पानात दडलेली अनेक रहस्ये आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'वसीका'. ही एक १७० वर्षे जुनी परंपरा आहे, जी आजच्या काळातही लखनौमधील नवाबांच्या वंशजांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून देते. विशेष म्हणजे, या परंपरेचे धागेदोरे थेट ईस्ट इंडिया कंपनीशी जोडलेले आहेत.
१८१७ साली, नवाब शुजा-उद-दौला यांच्या पत्नी, बहू बेगम यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सुमारे चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात एक अट घालण्यात आली होती - या रकमेवरील व्याजातून मिळणारी रक्कम त्यांच्या नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन म्हणून दिली जाईल. या पेन्शनलाच 'वसीका' असे म्हटले जाते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, १८५७ चा उठाव आणि १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. आज लखनौमध्ये सुमारे १२०० लोक आहेत ज्यांना हा 'वसीका' मिळतो. मात्र, काळाच्या ओघात या पेन्शनची रक्कम खूपच कमी झाली आहे. पिढ्यानपिढ्या विभागली गेल्याने काहींना तर महिन्याला फक्त ३ ते १० रुपये मिळतात. तरीही, या तुटपुंज्या रकमेकडे केवळ पैसे म्हणून पाहिले जात नाही.
'वसीका' मिळवणारे लोक याला आपली ओळख, सन्मान आणि नवाबी वारशाशी जोडलेले प्रतीक मानतात. ही रक्कम घेण्यासाठी होणारा खर्च पेन्शनपेक्षा जास्त असला तरी, हा वारसा जपण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. सरकारचे 'विल ऑफिस' आणि हुसेनाबाद ट्रस्ट यांच्यामार्फत या पेन्शनचे वाटप केले जाते. आजही मूळ रक्कम लखनौच्या एका बँकेत सुरक्षित असून, त्यावरील व्याजाचा हा ऐतिहासिक करार जपला जात आहे.