गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:19 PM2019-03-11T18:19:31+5:302019-03-11T18:45:34+5:30

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने या हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

In the last 21 days, the elimination of 18 terrorists | गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

गेल्या 21 दिवसांत पुलवामाच्या मास्टरमाइंडसह 18 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराची माहिती

Next

श्रीनगर - काश्मीरमधील दहशतवादी कारवायांविरोधात आघाडी उघडणाऱ्या भारतीय लष्कराला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे धक्का बसला होता. मात्र या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने पुलवामा हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्याची आखणी करणाऱ्यासह आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तसेच या वर्षातील पहिल्या 70 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, या दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची संख्या अधिक आहे. 

कालापासून पिंगलिश येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्यातील एका मास्टर माइंडचाही समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी लष्कराच्या 15 व्या तुकडीचे जीओसी के.जे.एस ढिल्लन आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. ''गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी 8 दहशतवादी हे पाकिस्तानी होते. तसेच त्यांनी भारतात घुसखोऱी करून दहशतवादी कारयावा करण्याचा कट रचला होता. गेल्या काही दिवसांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात काही मोठी ऑपरेशन्स तडीस नेली आहेत. तसेच पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहील.'' असे ढिल्लन यांनी सांगितले.

 





दरम्यान, रविवारी पुलवामामधील पिंगलिश येथे झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदच्या मुदस्सिर अहमद याला लष्कराने कंठस्नान घातल्याची माहिती  काश्मीर विभागाचे आयजी स्वयं प्रकाश पाणी यांनी दिली आहे. मुदस्सिर यानेच पुलवामा हल्ल्याचे कारस्थान रचले होते. तसेच तो आणि त्याचे काही सहकारी पुलवामामधील पिंगलिश गावात लपून बसल्याची माहिती लष्करामा मिळाली. त्यानंतर शोधमोहीम राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, गावामध्ये लष्काराची शोधमोहीम सुरू आहे. ही मोहीम संपल्यानंतर अन्य माहिती दिली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  





पुलवामा हल्ल्यामध्ये किती स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग होता, याचा तपास सुरू आहे. रविवारी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत मुदस्सिर याला ठार करण्यात आले आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, घटनास्थळावरून तीन रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.  

Web Title: In the last 21 days, the elimination of 18 terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.