भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:05 IST2020-01-30T05:03:57+5:302020-01-30T05:05:06+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.

भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम
नवी दिल्ली : भाजपच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ असल्याचे पाहून भाजप नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा, प. बंगाल प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवी यांनी वापरलेली भाषा भयचकित करणारी आहे. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष या नेत्यांना ताकीद का देत नाहीत? असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
भाजप खासदार वर्मा यांनी मंगळवारी प्रचार सभेत असे म्हटले होते की, शाहीन बाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात जमलेले लाखो निदर्शक घरात घुसून महिलांवर बलात्कार करतील, त्यांना ठार मारतील. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडले, ते दिल्लीतही होऊ शकते. अन्य एका प्रचार सभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी निदर्शनकांवर टीका करताना देशद्रोहींना गोळ्या घाला, असे चिथावणीकारक विधान केले होते.