"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 22:09 IST2025-07-08T22:09:21+5:302025-07-08T22:09:58+5:30
डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी या अपघाताचा संबंध भाषेशी जोडला आहे...

"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
तामिळनाडूतील कडलूर जिल्ह्यात सेम्मनगुप्पम येथे मंगळवारी (8 जुलै 2025) एक स्कूल व्हॅन आणि ट्रेनचा अपघात झाला. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दक्षिण रेल्वेने या दुःखद घटनेची माफी मागत रेल्वे फाटकावर तैनात गेटकीपरला निलंबित केले आहे. यानंतर, त्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी या अपघाताचा संबंध भाषेशी जोडला आहे.
"ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्याला तमिळ येत नव्हतं" -
यासंदर्भात बोलताना द्रमुक प्रवक्ते टीकेएस एलांगोवन म्हणाले, "या ठिकाणी यापूर्वीही एक अपघात झाला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतः म्हटले होते की ड्युटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्याला तमिळ भाषा येत नसल्याने हे घडले. त्याला दिलेला आदेश तो समजू शकला नाव्हता. आता झालेल्या अपघातातही असेच घडले आहे. अशा महत्त्वाच्या पदांवर स्थानिक भाषा जाणणाऱ्या लोकांनाच नियुक्त करणे केव्हाही चांगले. हेच उपयुक्त ठरेल. यामुळे किमान जीव तरी वाचतील."
धावत्या ट्रेनची धडक -
यासंदर्भात रेल्वे विभागाने म्हटले आहे की, "सकाळी ७:४५ च्या सुमारास, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन कुडलूर आणि अलप्पक्कम दरम्यान रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १७० ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. याच वेळी, तिला ट्रेन क्रमांक ५६८१३ विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेनची धडक झाली." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन धडकेनंतर रेल्वे क्रॉसिंगपासून काही अंतरावर पडली. यानंतर लोको पायलटने काही अंतरावर ट्रेनही थांबवली होती.
पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने म्हटले आहे की, "शाळेत पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून व्हॅन चालकानेच गेट ओलांडण्याची परवानगी मागितली होती आणि गेटकीपरने नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करत त्याला गेट ओलांडण्याची परवानगी दिली. गेटकीपरने नियमांनुसार गेट उघडायला नको होते. याप्रकरणी गेटकीपरला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला सेवेतून काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे."