Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:27 IST2025-11-17T08:25:54+5:302025-11-17T08:27:13+5:30
Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले.

Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा दारुण पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झाले आहे. लालू यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी व त्यांच्या सहकाऱ्यावर रविवारी गंभीर आरोप करत घर सोडल्यानंतर आता लालू यांच्या इतर तीन मुलींनीही लालूंचे घर सोडले आहे.
तीन वर्षापूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान करणाऱ्या रोहिणी म्हणाल्या की, पैसा व निवडणुकीच्या तिकिटासाठी वडिलांना खराब किडनी दान केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. असे कोणाच्याही बाबतीत होऊ नये. मी कायम सत्य बोलत आले आहे.
रोहिणी यांनी लालूंचे घर सोडल्यानंतर राजलक्ष्मी, रागिनी आणि चंद्रा या लालू यांच्या तीन मुली आपल्या मुलांसोबत पाटणा येथील कुटुंबीयांच्या निवासस्थानातून दिल्लीकडे रवाना झाल्या. पक्षात माझा अवमान करण्यात आला. शिवीगाळ करण्यासोबत मला चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा एक्स या सोशल मीडियाद्वारे रोहिणी आचार्य यांनी केला आहे. स्वाभिमान व सत्याशी तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे मला हे सर्व सहन करावे लागत आहे.
तेजस्वी, खासदार संजय यादव व भावाचा क्रिकटेच्या काळापासून जवळचा मित्र असलेल्या रमीझ यांनी मला घरातून हाकलले. कोट्यवधी रुपये व तिकिटासाठी मी माझ्या वडिलांना खराब किडनी दिल्याचा आरोप माझ्यावर झाला असल्याचा दावा रोहिणी यांनी केला.
तेजस्वी यादव यांच्यावर टीका
राजद पक्षावर आरोप करताना रोहिणी यांनी तेजस्वी व त्यांच्या मित्रांनादेखील लक्ष्य केले. मी सर्व विवाहित महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या पालकांना वाचविण्यासाठी कधीही काहीही करू नये. त्यांना भाऊ असेल तर त्यांनी त्याला २ किडनी दान करण्यास सांगावे किंवा त्याच्या हरियाणवी मित्राला तसे करण्यास सांगवे, असा महिलांना सल्ला देत रोहिणी यांनी तेजस्वी यांच्यावर टीका केली.
राजदकडून आश्चर्यकारक मौन
रोहिणी आचार्य यांनी गंभीर आरोप केले असले तरी तेजस्वी यादव किंवा राजद पक्षाकडून यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, रोहिणी यांच्या सततच्या आरोपांमुळे पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.