नवी दिल्ली - IPL चे माजी चेअरमन ललित मोदी याने त्यांचं भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला आहे. ललित मोदीभारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. आता त्याने प्रशांत महासागराच्या एका बेटावरील देश वनुआतुचं नागरिकत्व मिळवलं आहे. लंडन येथील भारतीय दूतावास कार्यालयात ललित मोदीने भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला असून नियम आणि कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परराष्ट्र खात्याच्या प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.
परराष्ट्र खात्याने सांगितले की, ललित मोदीने वानुआतु देशाचं नागरिकत्व घेतल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही कायदेशीर बाबी तपासून त्याविरोधात पुढे जात आहोत. ललित मोदीवर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्षपद असताना एका कंत्राटात हेराफेरी आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. ललित मोदी केवळ एकदाच मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसमोर हजर झाला. त्यानंतर मे २०१० साली त्याने भारतातून पलायन करत यूकेला पळून गेला.
काय आहे प्रकरण?
सध्या जगातील आणि देशातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा IPL ची सुरूवात ललित मोदीने केली होती. २००९ साली भारतात निवडणुका असल्याने तेव्हाचं आयपीएल सामने दक्षिण आफ्रिकेत आयोजित करावे लागले. २०१० साली आयपीएल फायनलनंतर ललित मोदीने २ नव्या फ्रेंचाइजी पुणे आणि कोच्ची टीमसाठी बिडिंगमध्ये हेराफेरी केली. त्यानंतर नियम भंग आणि गैरव्यवहार हा आरोप झाल्यानंतर ललित मोदीला BCCI मधून निलंबित केले.
अलीकडेच ललित मोदी चर्चेत आला होता. २०२५ च्या व्हेलंटाईन दिवशी त्याने नवीन गर्लफ्रेंड रायम बोरीविषयी सांगितले. तिच्यासोबतचे फोटो शेअर करत पोस्टमध्ये २५ वर्षाची मैत्री आता प्रेमात बदलली आहे असं लिहिलं होते. २०२२ मध्ये ललित मोदी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबतच्या नात्यावरून चर्चेत आला होता.
वानुआतु देश कुठे आहे?
दक्षिण प्रशांत महासागराच्या ८० हून अधिक बेटांमध्ये वानुआतु असा देश आहे ज्याची लोकसंख्या ३ लाख इतकी आहे. १९८० मध्ये फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याकडून या देशानं स्वातंत्र्य मिळवलं. वानुआतु देशात नागरिकत्व घेण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इमिग्रेशन प्लॅनुसार एका नागरिकत्वासाठी १,५५,००० अमेरिकन डॉलर म्हणजे १ कोटी ३० लाख रक्कम भरून या देशाचं नागरिकत्व मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. वानुआतु या देशात १८०० भारतीय राहतात. मागील १८ महिन्यात ३० भारतीयांनी या देशाचं नागरिकत्व घेतले.