जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 22:42 IST2025-11-06T22:41:58+5:302025-11-06T22:42:44+5:30
JNU Elections: जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्या. यात एकही जागा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जिंकता आली नाही.

जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
JNU Election Result: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्या. मंगळवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली होती. सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाली. विद्यार्थी संघाच्या चारही जागा डाव्या संघटनांनी जिंकल्या. मागच्या निवडणुकीत एक जागा कमी मिळाली होती.
विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला कामगिरी उंचावता आली नाही आणि मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रीय युवक काँग्रेसह इतरही विद्यार्थी संघटना या निवडणुकीत उतरल्या होत्या.
अध्यक्षपदी अदिती मिश्रा
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डाव्या संघटनांकडून अदिती मिश्रा मैदानात होती. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विकास पटेल निवडणूक लढवत होता. अदिती मिश्रा विजयी झाली, तर पटेल दुसऱ्या स्थानी राहिला. पीएसए संघटनेची विजयलक्ष्मी शिंदे तिसऱ्या स्थानी राहिली. बीएपीएसएकडून राज रतन राजौरियाही ही निवडणूक लढवत होता.
उपाध्यक्ष पदाची निवडणुकीत गोपिका विजयी
मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डावे आघाडीवर होते. गोपिकाने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तान्या कुमारी दुसऱ्या स्थानी राहिली. राष्ट्र्रीय युवक काँग्रेसची शेख शाहनवाज तिसऱ्या स्थानी राहिली.
सचिव पदाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राजेश्वर कांत दुबे आघाडीवर होता. पण अखेरीस सुनील यादवने आघाडी घेत विजय मिळवला.
सहसचिव पदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनेच्या दानिश अलीने विजय मिळवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अंजू दमारा दुसऱ्या स्थानी राहिली.