'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST2021-10-07T13:21:48+5:302021-10-07T13:21:57+5:30
Lakhimpur Kheri Violence:लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकार रमन कश्यप यांचा मृत्यू झाला.

'शेतकऱ्यांविरोधात बोलण्याचा दबाव टाकला जातोय', पत्रकार रमन कश्यप यांच्या कुटुंबाचा आरोप
लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता. त्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. रमण यांच्या भावाने म्हटले की, त्यांच्या कुटुंबावर शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. रमणच्या हत्येसाठी शेतकऱ्यांना दोषी ठरवणे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष आणि त्याचे सहकारी निर्दोष असल्याचं सांगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
TOIच्या रिपोर्टनुसार, रमणचा भाऊ पवन म्हणाला, माझ्या वडिलांनी आणि मी मीडियाला एकच निवेदन दिले की, केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या वाहनाने रमण यांना चिरडले आणि गोळ्या घातल्या. पण, आता अनेक पत्रकार आणि स्थानिक लोक आम्हाला आमचे वक्तव्य बदलण्यास सांगत आहेत. रमण यांना शेतकऱ्यांनी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं सांगण्यात दबाव टाकत असल्याची माहिती पवन यांनी दिली.
रमणच्या कुटुंबीयांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला नाही
पवन पुढे म्हणाले, माझा भाऊ पत्रकार होता पण आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार. आम्हाला अद्याप रमणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेला नाही. आमची तक्रार दुसऱ्या एफआयआरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि शेतकर्यांच्या एफआयआरमध्ये आमची तक्रारही जोडली जाऊ शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.