'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:17 IST2025-11-05T10:17:28+5:302025-11-05T10:17:42+5:30
पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या 'रेप ऑन प्रॉमिस टू मॅरी' प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती म्हणाले, 'ज्योतिषाचा सल्ला खूप उशिरा घेतला गेला.'

'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
विवाह करण्याचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एका अत्यंत उपरोधिक शैलीत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. 'संबंध ठेवण्यापूर्वीच कुंडली जुळवायची होती, नंतर नाही,' असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले की, संबंधित पक्षकारांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करण्यापूर्वीच आपली कुंडली जुळवून घ्यायला हवी होती. केवळ लग्नाची वेळ जवळ आल्यावर पत्रिका जुळत नाही, हे कारण देऊन संबंध तोडणे योग्य नाही.
नेमके प्रकरण काय आहे?
हे प्रकरण एका पोलीस अधीक्षक आणि एका उप-अधीक्षक यांच्याशी संबंधित आहे. तक्रारदार महिला डीएसपीने आरोप केला आहे की, आरोपी एसपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर त्याने 'कुंडली जुळत नाही' हे कारण देत लग्न करण्यास नकार दिला.
सुनावणीदरम्यान, जेव्हा महिला वकिलांनी कोर्टाला सांगितले की 'कुंडली न जुळल्यामुळे' आरोपीने लग्नास नकार दिला, तेव्हा न्यायमूर्ती पारदीवाला हसून म्हणाले, "मला वाटते की या प्रकरणात ज्योतिषाचा सल्लाखूप उशिरा घेण्यात आला."
न्यायमूर्ती पुढे म्हणाले, "जर तारे जुळले नाहीत, तर तुम्ही सुखी वैवाहिक आयुष्य कसे जगणार? त्यामुळे संबंध सुरू करण्यापूर्वीच तुम्ही कुंडली जुळवून घ्यायला हवी होती, फक्त लग्नाच्या वेळी नाही."
आरोपी एसपी विरोधात दाखल झालेला खटला रद्द करण्याच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टाची ही उपरोधिक टिप्पणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.