पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आगीची भयंकर घटना घडली. एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तब्बल १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी रात्री मध्य कोलकातामधील फलपट्टी मछुआ परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची माहिती दिली. ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत सापडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले, असे वर्मा यांनी सांगितले.
आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये होते ६० लोक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज हॉटेलमध्ये जेव्हा आग लागल्याची घटना घडली. तेव्हा हॉटेलमध्ये ६० लोक होते. आगीत सापडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ११ पुरुष आहेत, एक महिला आणि २ मुलांचा समावेश आहे.
वाचा >>हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
आगीत मृत्यू झालेल्यांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत १३ लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर १२ जणांना सुट्टी देण्यात आली, तर १ जखमींवर उपचार सुरू आहेत.
अनेकांनी बाल्कनीतून उड्या मारल्या
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आग लागली. तेव्हा लोकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. काही जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. काही लोक हॉटेलच्या खिडक्यामधून बाहेर आले आणि तिथे उभे राहिले होते.
दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
लोकांना मदत करण्याचे तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.