know who counts the casualties of war | जाणून घ्या, कोण आणि कसा मोजतात युद्धातील मृतांचा आकडा?
जाणून घ्या, कोण आणि कसा मोजतात युद्धातील मृतांचा आकडा?

ठळक मुद्देयुद्धामध्ये किती जणांचा मृत्यू झाला याबाबत मोजणी कोणताच देश किंवा संघटना करत नाही. दोन देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा मृतांची मोजणी करण्याचं काम स्थानिक प्रशासनावर असतं. युद्धातील मृतांचा आकडा निश्चित करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सर्व्हिलान्स अशा दोन पद्धतींचा वापर केला जातो.

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. 

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच हा राजकीय मुद्दाही बनत चालला होता. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून पत्रकार परिषद घेऊन सोमवारी (4 मार्च) प्रथमच अधिकृतपणे सांगितले. यावेळी भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनुआ म्हणाले, 'आम्ही फक्त आमचं टार्गेट साधतो, आणि त्यावर मारा करतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जीवितहानी झाली, हे मोजणे आमचं काम नाही, ते सरकार पाहील.' तसेच मिग 21 हे विमान सक्षम असे फायटर जेट आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची शस्त्रास्त्र आणि मिसाईल सिस्टीम आहे. देशाकडील सर्वच एअरक्राफ्ट उत्कृष्ट दर्जाची असल्याचेही धनुआ यांनी यावेळी सांगितलं. 

युद्धातील मृतांचा आकडा कोण मोजतं?

युद्धामध्ये किती जणांचा मृत्यू झाला याबाबत मोजणी कोणताच देश किंवा संघटना करत नाही. युद्धात अनेक लोकांचा मृत्यू होतो. कोणत्याही युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचा निश्चित आकडा सांगण्यात आलेला नाही. दोन देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा मृतांची मोजणी करण्याचं काम स्थानिक प्रशासनावर असतं. तिथलं सरकार जो आकडा निश्चित करते तोच आकडा स्थानिक प्रशासनातर्फे जाहीर केला जातो. ज्या युद्धांमध्ये अधिक देश सहभागी झालेले असतात त्या युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या संयुक्त राष्ट्र जाहीर करत असतं, मात्र त्यांची संख्या ही देखील अंदाजावरच आधारीत असते.

युद्धातील मृतांचा आकडा कसा मोजला जातो?

युद्धातील मृतांचा आकडा निश्चित करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सर्व्हिलान्स अशा दोन पद्धतींचा वापर केला जातो. अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलान्स पद्धतीमध्ये मृतदेहांची मोजणी केली जाते किंवा युद्धाची झळ बसलेल्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. नमूना सर्वेक्षणाचा आधार घेऊन मृतांचा आकडा निश्चित केला जातो. पॅसिव्ह सर्व्हिलान्समध्ये माध्यमे, रुग्णालये, शवागरे, सुरक्षा दले आणि तटस्थ संस्थांद्वारे गोळा केलेल्या माहितीवरून मृतांचा आकडा निश्चित केला जातो. हा आकडा अनेकदा मृतांच्या खऱ्या आकड्याजवळ जाणारा असतो असे सांगितले जाते.

युद्धातील मृतांचा आकडा निश्चित करताना येणाऱ्या समस्या

युद्धातील मृतांचा आकडा निश्चित करण्यासाठी माहिती कोण देतो यावर सगळ्या गोष्टी प्रामुख्याने अवलंबून असतात. 1994 साली रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात 5 ते 10 लाख जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. इराकमध्ये इसिसविरूद्धच्या संघर्षात किती जणांचा मृत्यू झाला हे अजूनही निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे अमेरिकेने इसिसविरूद्ध लढणाऱ्या सैन्याकडून आलेला आकडाच आजपर्यंत ग्राह्य धरला आहे. अनेकदा पराभूत देशांकडून मृतांचा आकडा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हल्ला करणारा देश हा आकडा वाढवून सांगण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेयुद्धातील मृतांचा आकडा निश्चित कोणाचा मानायचा याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Web Title: know who counts the casualties of war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.