Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:36 IST2025-07-14T12:34:55+5:302025-07-14T12:36:05+5:30
Vishwas Kumar And Ahmedabad Plane Crash : विश्वासचा भाऊ अजय कुमार रमेशचा या अपघातात मृत्यू झाला. तो अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे.

Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
अहमदाबादविमानतळावरून उड्डाण करताच एअर इंडियाचं एआय ७१७ विमान १२ जून रोजी कोसळलं. या भयानक अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. पण या दुर्घटनेत एक चमत्कार घडला. विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी वाचला. पण आता अपघाताला एक महिना उलटला असला तरी तो या धक्क्यातून सावरू शकला नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, विश्वास सध्या कोणाशीही बोलत नाही आणि त्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे.
विश्वासचा भाऊ अजय कुमार रमेशचा या अपघातात मृत्यू झाला. तो अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्याच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, विश्वास रात्री अचानक जागा होतो आणि नंतर तासनतास झोपू शकत नाही. त्याची झोप उडाली आहे. परदेशातील अनेक नातेवाईक त्याच्या तब्येतीची विचारपूस करतात. पण तो कोणाशीही बोलू इच्छित नाही. दोन दिवसांपूर्वी आम्ही त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेलो जेणेकरून तो या मानसिक आघातातून बरा होईल.
जीव वाचला पण मनाने पूर्णपणे खचला
अपघाताच्या पाच दिवसांनी ७ जून रोजी विश्वासला अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याच दिवशी डीएनए मॅचिंगनंतर त्याचा भाऊ अजयचा मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी १८ जून रोजी विश्वासने स्वतः त्याच्या भावाचा मृतदेह खांद्यावर घेऊन दीव येथील स्मशानभूमीत नेला. हा क्षण भावनिक होता. विश्वासचा मोठ्या अपघातातून जीव वाचला पण तो मनाने पूर्णपणे खचला आहे.
"अपघात कधीच विसरता येणार नाही"
अपघाताच्या एक दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात विश्वासला भेटले. "विमानाने उड्डाण करताच ते हालू लागले आणि काही सेकंदातच खाली पडले. मी पाहिलं की दरवाजा तुटलेला होता आणि मला वाटलं की मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. कसा तरी मी बाहेर आलो. मी तिथून बाहेर पडलो पण हा अपघात कधीच विसरता येणार नाही" असं विश्वासने सांगितलं होतं.