हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:15 IST2026-01-14T16:09:36+5:302026-01-14T16:15:55+5:30
बाईकवरून घरी परतत असताना रस्त्यावर आलेल्या एका मांजाने गळा चिरला.

हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
कर्नाटकच्या बीदरमध्ये ४८ वर्षीय संजुकुमार होसामनी यांचा पतंगाच्या प्राणघातक मांजामुळे मृत्यू झाला. बाईकवरून घरी परतत असताना रस्त्यावर आलेल्या एका मांजाने त्यांचा गळा चिरला. वेदनेने विव्हळत असताना त्यांनी आपल्या मुलीला शेवटचा फोन केला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तालमदगी पुलाजवळ ही धक्कादायक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजुकुमार बंबुलागी गावातून हुमनाबादला जात होते. बाईकवरून प्रवास करत असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. बाईकला वेग असल्याने या मांजाने गळा चिरला गेला. गंभीर दुखापत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजुकुमार यांनी आपल्या मुलीला फोन लावला. वेदनेने विव्हळत ते म्हणाले, "बेटा, मी येतोय..." पण हा त्यांचा शेवटचा शब्द ठरला.
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याचा आरोप
जर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती, तर कदाचित त्यांची जीव वाचला असता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मदतीची वाट पाहताना वेळ निघून गेला आणि संजुकुमार यांचा मृत्यू झाला. या निष्काळजीपणामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नायलॉन मांजावर बंदीची मागणी
या अपघातानंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरवर्षी या जीवघेण्या मांजामुळे अनेक निष्पापांचे बळी जातात, तरीही प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. जमावाने आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा करण्याचीही मागणी केली.
मन्ना एकहेली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र दरवर्षी मांजाचे बळी ठरणाऱ्या निष्पापांना वाचवण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.