हरयाणात आज खट्टर यांचा शपथविधी; दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:33 IST2019-10-27T00:32:37+5:302019-10-27T00:33:03+5:30
दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपचे ४०, जेजेपीचे १० व अपक्ष ६ अशा एकूण ५६ आमदारांचा आपणास पाठिंबा आहे.

हरयाणात आज खट्टर यांचा शपथविधी; दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद
बलवंत तक्षक
चंदीगड : हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांचा रविवारी मुख्यमंत्री म्हणून, तर दुष्यंत चौटाला यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.
दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला. राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. त्याआधी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली.नंतर मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. देशभर दिवाळी साजरी होत असतानाच दुपारी सव्वादोन वाजता शपथविधी समारंभ होईल.
दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपचे ४०, जेजेपीचे १० व अपक्ष ६ अशा एकूण ५६ आमदारांचा आपणास पाठिंबा आहे. आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आपण दावा दाखल केला होता, असे ते म्हणाले. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे आधी सांगण्यात आले होते. भद्रा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होती. तथापि खट्टर यांनीच दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.