काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:31 IST2025-12-14T10:30:17+5:302025-12-14T10:31:34+5:30
Kerala Election Results: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालांमुळे केरळमधील राजकीय हवा बदलत असल्याचे संकेत मिळत असून, या निकालांचा २०२६ मध्ये होणाऱ्या केरळमधील विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याबाबच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
शनिवारी लागलेल्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात दहा वर्षांपासून सत्ता असलेल्या डाव्या पक्षांचा आघाडीची मोठी पीछेहाट झाली. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तसेच आतापर्यंत केरळमध्ये नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपाने राज्यातील शहरी भागांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलं आहे. आता या निकालांमुळे केरळमधील राजकीय हवा बदलत असल्याचे संकेत मिळत असून, या निकालांचा २०२६ मध्ये होणाऱ्या केरळमधील विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याबाबच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांना २०२६ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी वाहत असलेल्या राजकीय हवेची दिशा स्पष्ट केली आहे. या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी सीपीआयएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफला पराभवाचा धक्का बसला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने शहरी आणि ग्रामीण अशा राज्याच्या दोन्ही भागांत जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने काही भागात लक्षणीय यश मिळवून आगामी विधानसभा निवडणुकीत केरळमधील प्रस्थापित असलेल्या दोन्ही आघाड्यांसमोर कडवं आव्हान उभं करण्याचे संकेत दिले आहेत.
केरळमधील सहा महानगरपालिकांपैकी ४ महानगरपालिकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने बाजी मारली आहे. तर डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने प्रत्येकी एका महानगरपालिकेत सत्ता मिळवली आहे. राज्यातील ८६ नगरपालिकांपैकी ५४ नगरपालिकांमध्ये यूडीएफने तर २८ नगरपालिकांमध्ये एलडीएफला विजय मिळाला आहे. तर केवळ २ नगरपालिकांमध्ये एनडीएची सत्ता आली आहे.
एवढंच नाही तर डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या केरळमधील ग्रामीण भागांतही काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ९४१ पैकी ५०४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. तर एलडीएफने ३४१ आणि एनडीएने २६ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. तर ब्लॉक पंचायतींमध्ये एलडीएफने ६३ तर यूडीएफने ७९ ठिकाणी विजय मिळवला. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी ७ ठिकाणी विजय मिळाला. केरळमधील ग्रामीण भागात काँग्रेसने पहिल्यांदाच एवढा मोठा विजय मिळवला आहे. सर्वसाधारणपणे पंचायत स्तरावर सीपीआयएमचा कॅडर आणि संघटनात्मक ताकद असल्याने त्यांचे पारडे जड राहते. मात्र यावेळी सीपीआयएमची पीछेहाट झाल्याचं दिसून आलं.
या निकालांमधील धक्कादायक बाब म्हणजे केरळमधील शहरी भागात एलडीएफचा दारुण पराभव झाला. यूडीएफने कोल्लम, त्रिशूर आणि कोचिन महानगरपालिकांमध्ये डाव्या आघाडीचा पराभव केला. तसेत कन्नूर महानगरपालिकेतील सत्ता कायम राखली. तर कोझिकोड महानगरपालिकेत एलडीएफचा निसटता विजय झाला. एवढंच नाही तर केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम येथे डाव्या आघाडीला भाजपाने सर्वात मोठा धक्का दिला. भाजपाने १०१ पैकी ५० जागांवर विजय मिळवत डाव्या पक्षांची येथील ४५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली. एलडीएफला केवळ २९ जागांवर विजय मिळवता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिरुवनंतपुरम येथील एनडीएच्या या विजयाचं कौतुक केलं आहे. याशिवाय पलक्कड नगरपालिकेतही भाजपाने आघाडी घेतली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मुख्यत्वेकरून स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. मात्र या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरामध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीविरोधातील कल दिसून आला. डाव्या पक्षांनी या निवडणुकीपूर्वी अनेक लोकप्रिय घोषणा करून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचे पूर्ण प्रयत्न केले होते. मात्र मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. उलट विरोधी पक्षांकडून सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या कथित चोरीचा मुद्दा लावून धरण्यात आला.
या पराभवानंतर सीपीआयएमचे राज्यातील सचिव एम.व्ही. गोविंदन यांनी अँटी इन्कम्बन्सीचे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच राज्यातील १४ पैकी ७ जिल्हा परिषदांत पक्षाला मिळालेल्या विजयाचा आधार घेत राज्यात पक्षाचा जनाधार कायम असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे राज्यात भाजपाचा विस्तार हा काँग्रेस नाही तर डाव्या पक्षांच्या जनाधाराला सुरुंग लावून होत असल्याचे दिसून येत आहे. तिरुवनंतपुरम, पलक्कड आणि कोझिकोडेसारख्या परिसरातील एनडीएचा विस्तार त्याचे संकेत देत आहे. मात्र तिरुवनंतपुरम वगळता इतर ठिकाणी भाजपाला मिळालेली आघाडी ही भाजपाचा झालेला विस्तार आहे, असं म्हणता येणार नाही, असा दावा डाव्या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकाल काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारे आहेत. मात्र हेच यश काही महिन्यांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवण्यासाठी काँग्रेसला संघटनात्मक ताकद वाढवून स्पष्ट रणनीती आखावी लागेल. आता केरळमधील हे राजकीय बदलाचे वारे कुठल्या दिशेने वाहतील हे पुढील सहा महिन्यातील राजकीय घडामोडी निश्चित करतील.
