आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:54 IST2025-05-14T14:53:51+5:302025-05-14T14:54:16+5:30
Kerala Crime News: २०१७ साली केरळमधील तिरुवनंतरपुरम येथे एक धक्कादायक घटना घडली होती. येथे एका तरुणाने आई-वडील, बहीण आणि मावशीची क्रूरपणे हत्या केली होती. या प्रकरणी आरोपी केडेल जीनसन राजा या आरोपी तरुणाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
२०१७ साली केरळमधील तिरुवनंतरपुरम येथे एक धक्कादायक घटना घडली होती. येथे एका तरुणाने आई-वडील, बहीण आणि मावशीची क्रूरपणे हत्या केली होती. या प्रकरणी आरोपी केडेल जीनसन राजा या आरोपी तरुणाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय-VI ने मंगळवारी हा निकाल सुनावताना आरोपी केडेल याला जीवनभर तुरुंगात राहावं लागेल, असे सांगितले. तसेच त्याच्यावर १५ लाख रुपयांचा दंडठी ठोठावला. ही रक्कम पीडितांचे नातेवाईक असलेल्या जोस सुंदरम याला देण्यात यावी, असे आदेश कोर्टाने दिले.
ही घटना एप्रिल २०१७ मध्ये घडली होती. तसेच तीन दिवसांच्या आत चार जणांची हत्या करण्यात आली होती. आरोपी केडेल याने सुरुवातीला आपल्या आई वडील आणि बहिणीला व्हिडीओ गेम दाखवण्याच्या बहाण्याने खोलीत बोलावले. ते जेव्हा खोलीत आले तेव्हा आरोपीने त्यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला करून या तिघांचीही हत्या केली. या घटनेबाबत त्याच घरात खालच्या मजल्यावर राहणाऱ्या मावशीला काहीही माहिती नव्हती. त्यानंतर आरोपीने तिचीही हत्या केली.
या चौघांची हत्या केल्यानंतर आरोपी केडेल याने पोलिसांना पुरावे मिळू नयेत तसेच मृतदेह जळून जावेत यासाठी घरातच आग लावली. पण त्याला आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यानंतर तो घाबरून चेन्नईमध्ये पोहोचला. तिथे टीव्हीवरच्या बातम्या पाहून त्याला हे प्रकरण चिघळल्याचा अंदाज आला. त्यानंतर तो पु्न्हा तिरुवनंतपुरम येथे आला. तिथे त्याला पोलिसांनी पकडले.
केडेल सुरुवातीला आपण मानसिक रुग्ण आहोत, असं भासवण्यासाठी मी आत्म्याला शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयोग करत होतो, असा दावा केला. मृ्त्यूनंतर आत्मा शरीर कसं सोडतो हे मला पाहायचं होतं, असेही सांगितले. मात्र पोलीस आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासामध्ये तो नाटक करत असल्याचे उघड झाले. तसेच तो मानसिकदृष्ट्या व्यवस्थित असल्याचे समोर आले.
आरोपी कॅडल हा परदेशातील शिक्षण अर्धवट सोडून परत आला होता. त्यानंतर तो घरात स्वत:ला एकटा समजू लागला. तसेच कुटुंबीयांचा द्वेश करू लागला. आपले आई-वडीलआपल्याला आपल्या इच्छेनुसार जगू देत नसल्याचे उघड झाले. त्याला मित्रांना भेटण्याचं स्वातंत्र्य मिळत नव्हतं. तसेच त्याला त्याच्या वडिलांची जीवनशैलीही आवडत नव्हती, अशी माहितीही समोर आली आहे.