"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:21 IST2025-08-15T17:14:40+5:302025-08-15T17:21:35+5:30
RSS Mohan Bhagwat on stray dogs supreme court: देशातील भटक्या कुत्र्यांचे आयुष्य कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर वाद-विवाद सुरू असून, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली आहे.

"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
Mohan Bhagwat on Stray Dogs : 'भटक्या कुत्र्यांची समस्या त्यांना निवारागृहात पाठवून सुटणार नाही', अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली. भागवत यांनी या मुद्द्यावर सरकारला पर्यायही सुचवला आहे. मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये संतुलन राहणे आवश्यक आहे, असे भाष्यही त्यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सरसंघचालक मोहन भागवत ओडिशामधील कटकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. जनसमुदायाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी देशभरात चर्चेत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या विषयावरही भूमिका मांडली.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर काय सुचवला पर्याय?
सरसंघचालक भागवत भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, "माणूस आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखला गेला पाहिजे. विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन साधून निसर्गाचे रक्षण केले पाहिजे."
"भटक्या कुत्र्यांची समस्या फक्त त्यांना निवारागृहांमध्ये पाठवून सुटणार नाही. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी लागेल, तरच त्यांचा प्रश्न सुटेल", असे मोहन भागवत म्हणाले.
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले आणि त्यामुळे जीवितास निर्माण होणारा धोका, हा विषय सध्या देशभरात चर्चिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा मुद्दा गांभीर्याने घेत रस्त्यावर फिरणारी कुत्री निवारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशी भागांत असलेली भटकी कुत्री ८ आठवड्यांच्या आत निवारागृहात पाठवली जावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाचा फेरविचार करण्यासंदर्भात अर्ज दाखल केलेला असून, सरन्यायाधीश गवईच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर यांची पुन्हा सुनावणी होणार आहे.