रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून ११००० फूट उंचावर असलेल्या केदारनाथ धामची यात्रा सुरू आहे. पण, मुसळधार पाऊस, धुके आणि थंडी... मागील काही दिवसांपासून केदारनाथ आणि आजबाजूच्या परिसरात आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने भाविकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कारण सलग होत असलेल्या पावसामुळे केदारनाथ धामकडे जाणाऱ्या रस्त्यांत अडथळे निर्माण होत आहेत. याचा त्रास भाविकांना होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केदारनाथ आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर दगडही कोसळले आहेत. पायी जाण्याच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच अचानक तापमान घसरल्याने देशाच्या इतर भागातून गेलेल्या भाविकांना कडाक्याच्या थंडीही सोसावी लागत आहे.
केदारनाथ आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस होण्याचा अंदाज
हवामान विभागाने १६ मे ते २१ मे या काळात केदारनाथ धाम आणि लगतच्या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर तु्म्हीही केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस टाळलेलं बरं. कारण पाऊस वाढला, तर अडचणी येऊ शकतात, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, केदारनाथ आणि बाजूबाजूच्या भागामध्ये पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर प्रचंड धुके पडू लागले आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे तापमानात घट झाली असून, उणे २ डिग्री सेल्सिअस झाले आहे. पाऊस आणि घसरलेला तापमानाचा पारा, यामुळे भाविकांना थंडीचा त्रास सोसावा लागत आहे.
११ हजार फूटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या केदारनाथ धामला जाण्यासाठी जवळपास १६ किमी अंतर पायी चालत जावं लागतं. काही भाविक खेचर किंवा तिथल्या मजुरांची मदत घेतात. पण, पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणीही साचले आहे, त्यामुळे अडचणी येत आहेत.