Jammu Kashmir: दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितावर गोळीबार, 24 तासांत 4 बाहेरील मजुरांनाही केलं टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 21:27 IST2022-04-04T21:26:43+5:302022-04-04T21:27:35+5:30
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रागाममध्ये सोमवारी सायंकाळी काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बलजी यांना तीन गोळ्या लागल्या आहेत.

Jammu Kashmir: दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितावर गोळीबार, 24 तासांत 4 बाहेरील मजुरांनाही केलं टार्गेट
जम्मू-काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास, एका काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जखमीला गंभीर अवस्थेत श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रागाममध्ये सोमवारी सायंकाळी काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बलजी यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेडिकल स्टोअर चालवणारे सोनू कुमार बलजी यांनी, काश्मिरी पंडितांच्या विस्थापना वेळीही खोरे सोडले नव्हते. बलजी गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरमध्येच राहतात. याशिवाय खोऱ्यात दहशतवाद्यांनी गेल्या 24 तासांत 7 जणांवर फायरिंग केली आहे. यात पुलवामामध्ये 4 बाहेरील मजूर, श्रीनगरमध्ये 2 CRPF चे जवान आणि आता शोपियानमध्ये एक काश्मिरी पंडित जखमी झाले आहेत.
काश्मिरी पंडित खोऱ्यात परत येऊ नयेत, यासाठी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.