Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:17 IST2021-06-03T14:15:40+5:302021-06-03T14:17:49+5:30
Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत, अशी प्रतिक्रिया कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय
श्रीनगर: गेल्या २४ तासांत दक्षिण काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले. यापैकी त्राल येथे झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यावेळी भाजप नेते राकेश पंडिता यांची हत्या करण्यात आली. तर, शस्त्रे पळवून नेताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. राकेश पंडिता यांच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून, फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत, अशी प्रतिक्रिया कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. (kashmiri pandit bjp councillor rakesh pandita murder terrorist in jammu kashmir tral)
भाजप नेते राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया दिली आहे. राकेश पंडित त्रालमध्ये आल्याची माहिती दहशतवाद्यांना दिली गेली असावी. यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. राकेश पंडिता यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
सीबीआय किंवा एआयए चौकशी झालीच पाहिजे
राकेश पंडिता यांचे मामा राधाकृष्ण रैना यांनी सांगितले की, सीबीआय असो किंवा एआयए राकेश पंडिता यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. काश्मिर खोऱ्यातील परिस्थिती अशी आहे की, अनेकांना काश्मिरी पंडित डोळ्यासमोरही नको आहेत. काश्मिर पंडितांची उपस्थिती त्यांच्या डोळ्यात खुपतेय. म्हणूनच अशा घटना घडत आहेत.
हा वेडेपणा बंद झाला पाहिजे - सिब्बल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राकेश पंडिता यांच्या हत्येप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. राजकारणात शस्त्रे, बंदुका यांना कोणतेच स्थान नाही. भाजप नेता राकेश पंडिता यांची हत्या असो किंवा ३० मार्चला भाजपच्याच दोन नगरसेवकांची झालेली हत्या हा निव्वळ वेडेपणा आहे आणि तो बंद झालाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही राकेश पंडिता यांच्या हत्येबाबत तीव्र शोक व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.