VIDEO: काश्मीर हादरलं! सोनमर्गमध्ये मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारे हिमस्खलन; ११ जिल्ह्यांत हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:45 IST2026-01-28T07:42:27+5:302026-01-28T07:45:22+5:30
मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये भीषण हिमस्खलन झाले.

VIDEO: काश्मीर हादरलं! सोनमर्गमध्ये मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारे हिमस्खलन; ११ जिल्ह्यांत हाय अलर्ट
Sonmarg Avalanch: निसर्गाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये मंगळवारी रात्री १०:१२ च्या सुमारास भीषण हिमस्खलन झाले. या घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये बर्फाचा अवाढव्य डोंगर कोसळून काही क्षणांत इमारती आणि वाहनांना गिळंकृत करताना दिसत आहे.
सोनमर्गमधील सरबल भागात मंगळवारी रात्री सर्वत्र शांतता असताना अचानक डोंगरावरून बर्फाचा एक मोठा लोंढा खाली आला. पाहता पाहता या बर्फाच्या वादळाने संपूर्ण परिसराला आपल्या कचाट्यात घेतले. रस्त्यांवरील उभ्या असलेल्या गाड्या आणि स्थानिक इमारतींवर बर्फाचे थर साचले. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
कश्मीर : सोनमर्ग में बर्फीला तूफान, दिल दहला देने वाली CCTV सामने आई, अभी नुकसान की कोई खबर नहीं !! pic.twitter.com/ErYteKGfyf
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 27, 2026
दळणवळण पूर्णपणे ठप्प
सलग होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगर विमानतळावरील धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे तब्बल ५८ विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. तसेच श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग काझीगुंड आणि बनिहाल दरम्यान बर्फाच्या थरांमुळे बंद करण्यात आला आहे. आपत्कालीन सेवा वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बनिहाल आणि बडगाम दरम्यानची रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र ट्रॅक साफ केल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली.
११ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून ११ जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये गांदरबल, अनंतनाग, बांदीपोरा, बारामूला, कुलगाम, कुपवाडा, डोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांचा समावेश आहे.
भीषण बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्याने पोलीस कर्मचारी रुग्णांना स्ट्रेचरवरून बर्फातून चालत रुग्णालयात पोहोचवताना दिसत आहेत. प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटकांसाठी सल्ला
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत काही ठिकाणी हलका पाऊस आणि मध्यम बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या दिवसांत काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर हवामानाचा अंदाज घेऊन आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच प्रवासाचे नियोजन करा.